‘तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत पश्चिम बंगालमध्ये घुसखोरी अव्याहत सुरू आहे,’ असा आरोप केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी मंगळवारी केला. तसेच नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याला विरोध केल्याबद्दल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही त्यांनी टीका केली.
मालदा दक्षिण मतदारसंघातील रोड शोला संबोधित करताना अमित शहा यांनी मंगळवारी भ्रष्टाचार आणि घुसखोरीच्या मुद्द्यांवरून तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगाल सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, ‘तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत, घुसखोरी अव्याहतपणे सुरू आहे. ममता दीदी ‘सीएए’ला विरोध करत आहेत आणि निर्वासितांना नागरिकत्व मिळू देत नाहीत. तुम्हाला घुसखोरी आणि भ्रष्टाचार थांबवायचा असेल, तर भाजपला मत द्या.’ राज्यातील तृणमूल काँग्रेसचे कुशासन फक्त भाजपच संपवू शकते, असेही ते म्हणाले.
रायगंज मतदारसंघातील करंदीघी येथे एका सभेला संबोधित करताना शह म्हणाले की, भाजपने पश्चिम बंगालमधून लोकसभेच्या ३५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ‘कलकत्ता उच्च न्यायालयाने काल एक निर्णय दिला. हजारो नियुक्त्या रद्द केल्या. (२०१६ शिक्षक भरती परीक्षेद्वारे). लाखो रुपयांना या नोकऱ्या विकल्या गेल्या ही शरमेची बाब आहे. ही ‘कट-मनी’(कमिशन) संस्कृती आणि भ्रष्टाचार पश्चिम बंगालमधून संपला पाहिजे. तृणमूल हे कधीही रोखू शकत नाही, फक्त भाजपच रोखू शकते. सत्तेत आल्यास सीएए रद्द करण्याच्या काँग्रेस नेत्यांच्या टिप्पण्यांवर शाह म्हणाले, ‘काँग्रेस किंवा ममता बॅनर्जी दोघेही सीएएला हात लावण्याचे धाडस करू शकत नाहीत,’ असेही ते म्हणाले.