महिला अत्याचार: काँग्रेसने केली फडणवीसांची कोंडी; जुना व्हिडिओ केला शेअर

हायलाइट्स:

  • महिला अत्याचारावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी सुरूच
  • राज्य सरकारवर टीका करणाऱ्या फडणवीसांना काँग्रेसनं कोंडीत पकडले
  • सचिन सावंत यांनी केला फडणवीसांचा जुना व्हिडिओ शेअर

मुंबई: राज्यातील महिला अत्याचाराबाबत चिंता व्यक्त करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिलेलं पत्र आणि त्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावरून सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेसनं मुख्यमंत्र्यांची बाजू लावून धरत भाजपवर आसूड ओढणं सुरू केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवलेल्या उत्तरावर टीका करणारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी जोरदार पलटवार केला आहे. सावंत यांनी फडणवीसांचा जुना व्हिडिओच सोशल मीडियावर शेअर केला आहे.

साकीनाका येथील बलात्काराच्या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली होती. राज्यपालांनी स्वत: मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं व महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांनी देशभरातील महिला अत्याचाराच्या घटनांचे दाखले दिले होते. विशेषत: भाजपशासित राज्यात महिलांवरील अत्याचार सर्वाधिक असल्याकडं राज्यपालांचं लक्ष वेधलं होतं. त्यावर चर्चा करण्यासाठी संसदेचं अधिवेशन बोलावण्याची मागणी केंद्राकडं करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना केली होती. त्याच अधिवेशनात साकीनाक्यातील घटनेवरही चर्चा करण्याची तयारी दाखवली होती. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिलेल्या या उत्तरावर भाजपनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकार असंवेदनशील असून त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, अशी टीका चंद्रकांत पाटील व फडणवीस या दोघांनीही केली आहे.

वाचा: मुंबई पोलिसांना आणखी एक धक्का; लाचखोरीचे नवे प्रकरण समोर

फडणवीसांच्या या टीकेला सचिन सावंत यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. सावंत यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात महिला अत्याचाराबाबतची फडणवीसांची आताची भूमिका आणि मुख्यमंत्री असतानाची भूमिका दाखवण्यात आली आहे. फडणवीसांच्या काळात जेव्हा विरोधी पक्षांनी राज्यातील महिला अत्याचाराबाबत आवाज उठवला होता, तेव्हा फडणवीसांनी देशभरातील गुन्ह्यांची आकडेवारी विधानसभेत वाचून दाखवली होती. गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्र इतर राज्यांपेक्षा कसा मागे आहे, हे सांगितलं होतं. आपणच आपल्या राज्याची बदनामी करू नये, असं विरोधकांना सुनावलं होतं. हा व्हिडिओ शेअर करून सावंत यांनी, ‘फडणवीस साहेब, खरे असंवेदनशील कोण आहे?,’ असा बिनतोड सवाल केला आहे.
वाचा: सोमय्यांचं स्वागत करा, असं सांगताच मुरगूडकरांनी केली ‘अशी’ तयारी

Source link

Devendra FadnavisSachin Sawant Shares Devendra Fadnavis VideoSachin Sawant Shares VideoWomen Atrocityउद्धव ठाकरेकाँग्रेसदेवेंद्र फडणवीसमहिला अत्याचारसचिन सावंत
Comments (0)
Add Comment