अभ्यासावर, करियरवर लक्ष द्या, असा सल्ला आमदार सेन यांनी प्रेमी युगुलांना दिला. तेव्हा तिथे असलेल्या एका तरुणानं त्याची ‘व्यथा’ आमदारांकडे मांडली. आम्ही कुठे जायचं, असा सवाल त्यानं सेन यांना विचारला. तुम्ही ओयोदेखील बंद केले. प्रत्येक ठिकाणी तुमच्या नावाची दहशत आहे. आता आम्ही वैशाली नगर सोडून भिलाईच्या मैत्री बागेत जाऊ, असं तरुण म्हणाला.
बागेत उपस्थित असलेल्या एका २२ वर्षीय तरुणीनंही आमदारांसोबत वाद घातला. प्रेम करणं, लपूनछपून भेटणं कित्येक वर्षांपासून चालत आलेलं आहे. घरात पालक असतात, बाहेर तुम्ही, अशा शब्दांत तरुणीनं तिची व्यथा सांगितली. त्यावर बगिच्यात भेटू नका, असं सेन यांनी प्रेमी युगुलांना सांगितलं. ‘बगिच्याच्या आसपास राहणाऱ्या अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. बागेत येणारी अनेक प्रेमी युगुलं अश्लिल चाळे करतात. बागेत चालण्यासाठी येणाऱ्या महिलांना याचा त्रास होतो. इथलं वातावरण खराब होतं,’ अशा शब्दांत सेन यांनी प्रेमी युगुलांना समज दिली.
नेहरु नगरमध्ये असलेला बगिचा प्रेमी युगुलांचा अड्डा झाल्याची तक्रार आमदार सेन यांना मिळाली होती. या बागेत प्रेमी युगुलं अश्लिल चाळे करताना दिसतात. तक्रार मिळताच आमदार सेन स्वत: छापा टाकण्यास पोहोचले. तेव्हा तिथे अर्धा डझन प्रेमी युगुलं होती. आमदार आणि त्यांच्यासोबत काही जण तिथे पोहोचताच प्रेमी युगुलं काहीशी धास्तावली. आमदार कारमधून उतरले, एकेका कपलजवळ पोहोचले. त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोबाईलमध्ये या घटनेचं चित्रीकरण केलं.
बागेत काय करताय, असा सवाल आमदार सेन यांनी प्रेमी युगुलांना विचारला. त्यावर प्रेमी युगुलांनी त्यांची अडचण सांगितली. ‘तुम्ही ओयो बंद करुन टाकले. आता आम्ही कुठे जायचं? ओयो सुरू असताना आम्ही तिथे जायचो,’ असं प्रेमी युगुलांनी सांगताच सेन भडकले. ‘चुकीची कामं करणाऱ्यांना वैशाली नगरात थारा नाही. नेहरु नगर बगिच्यात कपल्सचे अश्लिल चाळे सुरू असल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून मिळत होत्या. त्यामुळेच मी आज इथे पोहोचलो,’ असं सेन यांनी सांगितलं.