‘शैक्षणिक संस्थांनी वैयक्तिक निवडीचा आदर करायला हवा. ज्या विद्यार्थिनींना हिजाब वापरायचा आहे, त्यांना तशी मुभा द्यायला हवी. धर्म, जात किंवा भाषा यामध्ये एकरूपता हवी, याच्याशी मी सहमत नाही. एका भाषेची सक्ती करायला नको. काही राज्यांमध्ये काही लोकांना अधिकृत भाषा हिंदी करायची असेल, तर ते तसे करू शकतात. पण दक्षिणेकडे ते कठीण होईल. ईशान्य आणि अगदी महाराष्ट्रात हिंदी स्वीकारली जाईल, असे मला वाटत नाही,’ असेही त्यांनी नमूद केले.
‘हिंदी असू शकते, पण एकाच भाषेची सक्ती नको. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी हे दोघेही त्रि-भाषा सूत्राबाबत बोलायचे, ते मूर्ख नव्हते. त्यांना माहीत होते की, भारतात कोणत्याही स्वरूपात एकरूपता काम करत नाही,’ असेही पंडित यांनी सांगितले. ‘भाषा हा खूप संवेदनशील मुद्दा आहे. त्याबाबत सर्वांना सावधगिरी बाळगायला हवी,’ असे मत त्यांनी मांडले. ‘कोणताही एक धर्म काम करेल, असेही मला वाटत नाही. कारण हे वैयक्तिक मुद्दे आहेत. पण प्रमुखांना हे करायचे आहे. एक विद्यापीठ म्हणून आपण सर्वांच्या वर असायला हवे. आपल्यासाठी ज्ञान मिळवणे महत्त्वाचे आहे. देश हा एका विशिष्ट समुदायासाठी नाही,’ असे त्या म्हणाल्या.
बहुभाषिकतेची गरज पंडित यांनी अधोरेखित केली. ‘प्रत्येकाने बहुभाषिक असायला हवे, या मताची मी आहे. कारण भारतामध्ये आपण सांस्कृतिक विविधता साजरी करतो. सर्व भाषा चांगल्या आहेत. मी कोणत्याही भाषेविरोधात नाही, परंतु माझ्यासाठी इंग्रजी भाषा अधिक सोयीस्कर आहे,’ असे त्यांनी सांगितले. शैक्षणिक संस्थांमध्ये ‘ड्रेस कोड’बाबत पंडित यांना प्रश्न करण्यात आला. यावर ‘ही वैयक्तिक निवड असायला हवी. मी ड्रेस कोडच्या विरोधात आहे. खुलेपणा असायला हवा. एखाद्याला हिजाब वापरायचा असेल, तर ती त्यांची निवड असेल. जर एखाद्याला वापरायचे नसेल, तर त्यांच्यावर बळजबरी करायला नको,’ असे त्यांनी नमूद केले.