वृत्तसंस्था, नवी दिल्ली : विमानात १२ वर्षांपर्यंतच्या बालकांना त्यांच्या किमान एका पालकाच्या किंवा त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीच्या जवळ आसन द्यावे, असे निर्देश नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमान कंपन्यांना दिले आहेत. ‘डीजीसीए’ने या संदर्भातील ‘विमान कंपन्यांच्या अतिरिक्त सेवा आणि शुल्के’ नियमावलीत दुरुस्तीही केली आहे. विमान उड्डाणादरम्यान १२ वर्षांखालील बालकांना त्यांचे पालक किंवा सोबतच्या व्यक्तीच्या जवळ आसन न दिल्याची प्रकरणे समोर आली होती.त्या पार्श्वभूमीवर, ‘डीजीसीए’ने हे निर्देश जारी केले आहेत. एकाच ‘पीएनआर’वर प्रवास करत असलेले पालक/सोबतच्या व्यक्ती यांच्यासोबत १२ वर्षांखालील बालकांना आसन द्यावे आणि त्याच्या नोंदी ठेवाव्यात, असे निर्देश ‘डीजीसीए’ने मंगळवारी दिले. ‘डीजीसीए’ने या संदर्भातील ‘विमान कंपन्यांच्या अतिरिक्त सेवा आणि शुल्के’ नियमावलीत दुरुस्ती केली आहे.
याअंतर्गत, झीरो बॅगेज, प्राधान्य आसने, जेवण, खाद्यपदार्थ, पेय शुल्क आणि वाद्यांच्या वाहतुकीसाठी शुल्क आदी सेवांना परवानगी देण्यात आली आहे. विमान कंपन्यांनी या सेवा देणे अनिवार्य नाही, तर ऐच्छिक आहे, असेही ‘डीजीसीए’ने स्पष्ट केले आहे.