हायलाइट्स:
- सोलापुरात वाळू माफियांचा उच्छाद
- पोलीस कर्मचाऱ्याला चिरडलं
- धक्कादायक घटनेनं प्रशासन हादरलं
सोलापूर : वाळू वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोने ग्रामीण पोलीस दलातील मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या एका पोलीस कर्मचाऱ्याला चिरडलं आहे. ही घटना मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी-शिरशी मार्गावर हॅटसन डेअरीजवळ घडली. आज सकाळी १० वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेत पोलीस कर्मचारी गणेश सोलनकर यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मुजोर वाळू माफियांनी दिवसाढवळ्या पोलिसालाच चिरडल्याने नदीकाठच्या गावांमध्ये दहशत पसरली आहे.
सोलापूर जिल्ह्यात सर्वच नद्यांच्या पात्रात गेल्या अनेक दिवसांपासून वाळू माफियांनी उच्छाद मांडला आहे. पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांशी कधी आर्थिक देवाण-घेवाण करून तर कधी दहशत माजवून वाळूची अवैध वाहतूक सुरू आहे. अशातच आज मंगळवेढा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यालाच वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाने चिरडलं आहे.
पोलीस कर्मचारी गणेश प्रभू सोनलकर (वय ३२) हे आज समन्स बजावण्यासाठी घटनेच्या ठिकाणी गेले होते. त्यावेळी गावच्या पोलीस पाटलांना डेअरी येथे येण्यास सांगून सोनलकर हे वाट पाहत थांबले असताना माण नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो समोरून येताना दिसला. त्यावेळी त्यांनी या टेम्पोला थांबण्यास सांगितलं. मात्र टेम्पोत वाळू असल्याने चालकाने टेम्पो थांबवण्याऐवजी थेट पोलीस कर्मचारी सोनलकर यांच्या अंगावर घातला.
टेम्पो चालकाने पोलीस कर्मचारी गणेश प्रभू सोनलकर (वय ३२) यांचा जीव घेतल्याने मंगळवेढा तालुक्यासह सोलापूर जिल्हा पोलीस प्रशासन चांगलंच हादरलं आहे. या प्रकरणी संशयित म्हणून रणजित सुडके आणि सागर मासाळ यांना ताब्यात घेतलं आहे. तसंच विना नंबर टेम्पो जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रीतसर गुन्हा दाखल झाला असून उपविभागीय पोलीस आधिकारी राजश्री पाटील पुढील तपास करत आहेत.