लोकसभा निवडणुका जाहीर होण्याच्याआधी रायबरेलीतून राहुल गांधींच्या नावाची चर्चा होती. पण त्यांनी वायनाड मतदासंघ कायम ठेवला. नंतर भाजपने उमेदवारी नाकारलेले पिलभीतचे खासदार वरुण गांधी यांच्या नावाची देखील चर्चा झाली. आता काँग्रेसकडून एक नवे नाव समोर येत आहे. रायबरेली मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. लवकरच त्यांच्या उमेदवारीची घोषणा होणार असून त्या १ ते ३ मेपर्यंत आपला उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे गांधी घराण्यातील आणखी एक सदस्य निवडणूकीच्या राजकारणात उतरण्याची शक्यता आहे.
रायबरेली आणि गांधी परिवार काय आहे समीकरण?
रायबरेली अणि गांधी घराण्याचं नातं गेली अनेक वर्ष असून गेली अनेक वर्ष या मतदारसंघातून गांधी परिवारातील सदस्य निवडून येत आहे. १९५२ साली स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभा निवडणूका पार पडल्या होत्या. १९५२ साली फिरोज गांधी यांनी या मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढून ते जिंकून आले होते. तेव्हापासून हा मतदारसंघ गांधी घराण्याचा पारंपारीक मतदार संघ राहिला आहे.
पाहुया गांधी घराण्यातील सदस्यांचा रायबरेलीमधला कार्यकाळ
१) फिरोज गांधी – १९५२ ते १९६२
२) इंदिरा गाधी – १९६७ ते १९७७
३) सोनिया गांधी – २००४ ते २०२४
अशा प्रकारे फिरोज गांधी १० वर्ष, इंदिरा गांधी १० वर्ष आणि सोनिया गांधी २० वर्ष असं गेल्या ७६ वर्षांमध्ये ४० वर्ष रायबेली मतदारसंघावर गांधी घराण्याचं वर्चस्व राहिलं आहे. आणि आता प्रियंका गांधी या मतदारसंघातून नशीब अजमावण्याची शक्यता आहे.
कशी आहेत रायबरेली मतदारसंघातील समीकरणं?
रायबरेली मतदारसंघावर सध्या काँग्रेसचं वर्चस्व आहे, पण आता स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणं खुप बदलली आहेत.त्याला कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात झालेली पक्षांतरं. गेल्या ५ वर्षात अनेक मोठ्या नेत्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे. सध्या या मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाने मोठी पकड बनवली आहे. याठिकाणच्या काँग्रेसच्या एकमेव आमदार अदिती सिंह यांनाी सुध्दा मागच्या विधानसभा निवडणूकीत भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अदिती सिंह यांच्या एकमेव विधानसभा मतदारसंघातून सोनिया गाधींना आघाडी होती. पण या ५ वर्षात पुलाखालून बरंच पाणी गेलं आहे. सध्या काँग्रेसचा एकही आमदार या लोकसभा मतदारसंघात नाही. आता प्रियंका गांधी यांना उमेदवारी मिळते का? आणि जर मिळाली तर त्यांच्यासाठी ही लढाई किती सोपी असेल हे पाहावं लागणार आहे.