राजेश टोपेंच्या राजीनाम्याची मागणी; संतप्त आंदोलकांनी पुतळाही जाळला!

हायलाइट्स:

  • आरोग्य विभागाची नियोजित परीक्षा केवळ एक दिवस आधी रद्द
  • निर्णयाचा निषेध करण्यासाठी नागपुरात विविध संघटनांनी केली निदर्शने
  • राजेश टोपे यांच्या राजीनाम्याचीही मागणी

नागपूर : महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा गट ‘क’ आणि ‘ड’ या पदांसाठी शनिवारी नियोजित परीक्षा केवळ एक दिवस आधी रद्द केल्याने उमेदवारांचा संताप उफाळून आला. शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी नागपुरात विविध संघटनांनी निदर्शने केली. सरकारच्या ढिसाळ नियोजनाचा आणि विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाचा मोठ्या प्रमाणावर निषेध करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील १२२ परीक्षा केंद्रांवर सुमारे ३६ हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार होते. आरोग्य विभागाच्या विविध पदांसाठी असलेल्या या ही परीक्षेसाठी इतर ठिकाणांहून विद्यार्थी नागपुरात येणार होते. शहरातूनही अनेक विद्यार्थी परीक्षेकरिता बाहेरगावी गेले होते. परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने या सगळ्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. विद्यार्थ्यांनी प्रवासाकरिता काढलेली तिकिटे, राहण्याच्या जागेचा केलेले खर्च सगळा व्यर्थ गेला. शासनाच्या या व्यवस्थेने विद्यार्थ्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास झाला. शनिवारी सका‌ळी काही विद्यार्थी परीक्षा केंद्रांवरही पोहोचले होते. तेथून त्यांना परत पा‌ठवण्यात आले. परीक्षा रद्द झाल्याची माहिती उशिरा मिळाल्यानेदेखील विद्यार्थ्यांना केंद्रावर जाण्याचे हेलपाटे घालावे लागले, अशी टीका विद्यार्थ्यांनी केली.

धक्कादायक: मुंबईत हत्याराचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार; आरोपी परिचयातील!

नागपुरात शासकीय मेडिकल कॉलेज येथे पॅरामेडिकल स्टुडंट्स वेल्फेअर अॅण्ड अल्युमनाय असोसिएशन व बीएस्सी, पीएमटी असोसिएशनच्या वतीने निदर्शने करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष अक्षय गायधने, कोषाध्यक्ष कीर्तीवंत सिन्हागडे, सल्लागार समिती अध्यक्ष ग्रोशिल टेंभुर्णी तसेच इतर विद्यार्थ्यांचा या निदर्शनांमध्ये समावेश होता. आप युवा आघाडीच्या वतीनेही गांधी गेट परिसरात मूक निदर्शने करण्यात आली. आघाडीचे संयोजक पीयूष आकरे, कृतल आकरे यांच्यासह इतर कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले होते. सोशल मीडियातूनही अनेकांनी राज्य शासनाविरोधात संताप व्यक्त केला. या संदर्भातील विविध पोस्ट आणि मीम्सही व्हायरल झाले होते.

‘आरोग्यमंत्री…राजीनामा द्या’

परीक्षा रद्द करावी लागल्याच्या नामुष्कीची जबाबदारी स्वीकारून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने केली आहे. संघटनेच्या वतीने मेडिकल चौक येथे निदर्शने करण्यात आली. आरोग्यमंत्री, राजेश टोपे यांचा प्रतीकात्मक पुतळा यावेळी जाळण्यात आला. गोरगरीब विद्यार्थी आपले पैसे खर्च करून परीक्षा केंद्रांवर पोहोचले होते. अशा विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी. पुढील दोन दिवसांत परीक्षेची तारीख निश्चित करून प्रसिद्ध करावी, अशाही मागण्या भाजयुमोने केल्या आहेत. आमदार प्रवीण दटके, भाजयुमो प्रदेश सरचिटणीस शिवानी दाणी, महानगर शहराध्यक्ष पारेंद्र पटले, महामंत्री सचिन करडे आणि दीपांशू लिंगायत तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Source link

health department newsncpRajesh Topeआरोग्य विभागआरोग्य विभाग भरतीराजेश टोपेराजेश टोपे आरोग्यमंत्री
Comments (0)
Add Comment