काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या विधानाबाबत, तर भाजपने राहुल गांधींच्या विधानासंदर्भात आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने पक्षाध्यक्षांना जबाबदार धरण्यासाठी लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदींचा वापर केला आहे. आयोगाने भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून याबाबत २९ एप्रिलपर्यंत उत्तरे मागवली आहेत.
पंतप्रधानांवरील आरोपांची प्रथमच दखल घेत निवडणूक आयोगाने सांगितले की, त्यांनी भाजपला विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या तक्रारींवर उत्तरे देण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाने नड्डा यांना, पक्षाच्या सर्व स्टार प्रचारकांच्या राजकीय भाषणांबाबत मापदंड निश्चित करण्यास आणि आचारसंहितेचे शब्दशः पालन करण्याची सूचना केली आहे.
राहुल गांधींविरोधातील भाजपच्या तक्रारींवरून आयोगाने मल्लिकार्जुन खर्गे यांना नोटीस पाठवली आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांच्या प्रमुखांना बजावलेल्या नोटिसांमध्ये मोदी किंवा गांधी यांचा थेट उल्लेख केलेला नसून त्यांच्या विरोधातील तक्रारींसह नोटिसा पाठवल्या आहेत. लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ७७चा संदर्भ देऊन आयोगाने आचारसंहिता आणि आयोगाने त्यांच्यासाठी ठरवलेल्या मानकांचे पालन करण्यासाठी या पक्षांच्या स्टार प्रचारकांची जबाबदारी पक्षाध्यक्षांवर टाकली आहे.
भाषणे नेत्यांची, उत्तर पक्षाध्यक्षांकडून का?
आयोगाने थेट राहुल गांधी किंवा पंतप्रधान मोदींना जाब का विचारलेला नाही? असा प्रश्न यातून उपस्थित होत आहे. त्यावर निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की, राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या, विशेषत: त्यांच्या स्टार प्रचारकांच्या कामासाठी त्या पक्षाच्या नेतृत्वाला सर्वप्रथम जबाबदार धरले पाहिजे. त्यामुळे आयोग पक्षाध्यक्षांकडून या तक्रारींची उत्तरे मागवतो. उच्चपदांवर असलेल्या लोकांच्या निवडणूक भाषणांचा व भाषेचा अधिक प्रभाव जनतेवर पडतो, असेही आयोगाने नोटिसांमध्ये स्पष्ट केले आहे.
काँग्रेसच्या तक्रारीत काय?
– ‘काँग्रसने जाहीरनाम्यात म्हटल्याप्रमाणे, जर काँग्रेस पक्ष सत्तेवर आला, तर ते लोकांची संपत्ती गोळा करतील आणि मुस्लिमांमध्ये वाटतील’, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी २१ एप्रिल रोजी राजस्थानच्या बांसवाडा येथील प्रचारसभेत केला होता. ‘काँग्रेसची मानसिकता शहरी नक्षलवाद्यांची असून, माता-भगिनींनो, ते तुमचे मंगळसूत्रही सोडणार नाहीत’, असेही मोदी म्हणाले होते.
– काँग्रेसने पंतप्रधानांवर आरोप केला आहे की, विशिष्ट धार्मिक समुदायाला लक्ष्य करून मोदी यांनी खोटे आणि फुटीरतावादी आरोप केले आहेत. अशा धार्मिक समुदायाविरुद्ध संभाव्यत: शांतताभंग करण्यासाठी त्यांनी सामान्य जनतेला चिथावणी दिली आहे. खोटे आरोप करून पंतप्रधानांनी मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
भाजपच्या तक्रारीत काय?
– ‘केरळ मल्याळम आहे, मल्याळम केरळ आहे. जेव्हा मी पंतप्रधानांना एक राष्ट्र, एक भाषा आणि एक धर्म असे भाषण देताना ऐकतो तेव्हा मला आश्चर्य वाटते. तुम्ही तमिळ लोकांना तमिळ न बोलण्यास, केरळच्या लोकांना मल्याळम न बोलण्यास कसे सांगू शकता? जेव्हा जेव्हा भाजपला संधी मिळते, तेव्हा तेव्हा ते देशाचे तुकडे करतात’, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी १८ एप्रिल रोजी केरळच्या कोट्टयम येथील सभेत केले होते.
– ‘निवडणुकीतील फायद्यासाठी भारतातील लोकांच्या मनात भाषिक आणि सांस्कृतिक फूट निर्माण करण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी केला आहे’, अशी तक्रार भाजपने केली आहे. भाजपच्या तक्रारीत काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. निवडणूक जिंकल्यास भाजप राज्यघटना बदलणार असल्याचे जाहीर करून खर्गे यांनी मतदारांची दिशाभूल केल्याचा आरोप भाजपने केला आहे.