हायलाइट्स:
- डोंबिवलीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेने संताप.
- पालकमंत्री शिंदे यांनी घेतली महत्त्वाची बैठक.
- पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या तातडीच्या सूचना.
ठाणे: डोंबिवली येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी शनिवारी महिला सुरक्षेसंदर्भातही जिल्ह्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलिस अधीक्षक व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. डोंबिवलीसारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलिस यंत्रणेने महिलांच्या छोट्यामोठ्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन कारवाई केली पाहिजे, जेणेकरून भविष्यात त्यातून गंभीर स्वरूपाचा गुन्हा होणार नाही, अशी महत्त्वाची सूचना यावेळी शिंदे यांनी केली. ( Eknath Shinde On Dombivli Gang Rape Case )
वाचा: आईचा अपघाती मृत्यू, वडील गंभीर; पैशांची जुळवाजुळव करत असतानाच…
महिला, तरुणींना पोलिसांकडे येऊन तक्रार करण्याबाबत विश्वास वाटला पाहिजे, तक्रार करण्यासाठी येणाऱ्या महिलांना उलटसुलट प्रश्न विचारून, त्यांचीच उलटतपासणी करून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका, असे सांगतानाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील निर्जन वास्तू, इमारती, बंद कारखाने या भागांत गस्त वाढविण्याचे निर्दशही एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत दिले. ठाणे जिल्हयातील पोलीस ठाण्यांमध्ये गस्तीसाठी अधिकची चार चाकी वाहने आणि दुचाकी उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही यावेळी शिंदे यांनी दिली. या बैठकीला ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग, नवी मुंबई पोलीस आयुक्त बी. के. सिंग, मिरा भाईंदर पोलीस आयुक्त सदानंद दाते, रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे, पालघर पोलीस अधिक्षक दत्ता शिंदे आणि ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस परीमंडळाचे उपायुक्त व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वाचा: मुंबईत हत्याराचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार; आरोपी परिचयातील!
घटनेने सर्वत्र संतापाची लाट
डोंबिवलीतील मानपाडा येथील १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. यात ३३ आरोपींचा समावेश असून आतापर्यंत २९ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात दोन आरोपी अल्पवयीन आहेत. मुलीसोबतच्या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपी विजय फुके याने २९ जनेवारी रोजी तिच्या नकळत अश्लील व्हिडिओ काढला व तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मित्रांच्या साथीने तिला थंडपेयातून नशेची पावडर तर कधी जबरदस्तीने दारू पाजत तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे तपासात समोर आले आहे. सर्व आरोपी नशेबाज असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली असून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार श्रीकांत शिंदे, भाजप आमदार भारती लव्हेकर, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मानपाडा पोलिसांची भेट घेत घटनेची माहिती घेतली व निष्पक्षपाती चौकशीची मागणी केली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
वाचा: करोनाबाबत दिलासा देणारे अपडेट्स; ‘ही’ आहे राज्यातील आजची आकडेवारी