वृत्तसंस्था, श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार, तर लष्कराचे दोन जवान जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली.उत्तर काश्मीरमधील सोपोरा जिल्ह्यातील मोहल्ला नौपोरा भागात गुरुवारी ही चकमक सुरू झाली. रात्रीच्या शांततेनंतर शुक्रवारी सकाळी पुन्हा चकमकीला सुरुवात झाली. यात आतापर्यंत दोन दहशतवादी मारले गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर, जखमी झालेल्या दोन जवानांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या चकमकीत एक नागरिकही जखमी झाल्याचे समजते. दहशतवाद्यांचा शोध अजूनही सुरू असल्याचे लष्करातर्फे सांगण्यात आले.
या दहशतवाद्यांकडून शस्त्रे आणि दारूगोळा हस्तगत करण्यात आला आहे. गुरुवारी सायंकाळी सोपोर भागात दोन दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती, अशी माहिती काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक व्ही. के. बिर्दी यांनी दिली. लष्कार आणि जम्मू आणिक काश्मीर पोलिसांनी गुरुवारी उरी, बारामुल्ला येथे राबवलेल्या संयुक्त शोधमोहिमेत एका दहशतवाद्याला पकडण्यात आले होते. गुप्तचर विभागाच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली.