रोहिणी यांच्या विरोधात भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रूडी उभे आहेत. सारण हा लालू प्रसाद यादव यांचा कोणे एके काळचा गड मानला जात असे. आता पुन्हा तो गड काबीज कण्यासाठी रोहिणी यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. सारण लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. बिहारच्या विधानसभा निवडणुकीत चार जागांवर ‘आरजेडी’ने विजय मिळवला आहे, तर दोन भाजपच्या ताब्यात आहेत. रोहिणी आचार्य या लालूंचे दुसरे अपत्य असून, मिसा भारती त्यांची मोठी बहीण आहे. रोहिणीनंतर लालूंना चार मुली आहेत. त्यानंतर तेजप्रताप आणि तेजस्वी यांचा क्रमांक लागतो. लालूंचे सर्वांत लहान अपत्य राजलक्ष्मी आहे. लालूंच्या पुढच्या पिढीतील अनेक जण सक्रिय राजकारणात असताना ही मुलगी राजकीय घडामोडींपासून दूरच होती. मात्र, आता यंदा तिलाही रिंगणात उतरविण्याची ‘रिस्क’ राष्ट्रीय जनता दलाने घेतल्याचे राजकीय तज्ज्ञ म्हणतात. रोहिणी यांचा विवाह २४ मे २००२ रोजी समरेशसिंह याच्याशी झाला होता. समरेश सिंगापूरमध्ये आयटी क्षेत्रात काम करतात. लग्नानंतर काही काळापासून रोहिणी आपल्या पतीसोबत सिंगापूरमध्ये राहत होत्या. रोहिणी आणि समरेशसिंह यांना एक मुलगी आणि दोन मुले आहेत. सिंगापूरमध्ये गृहिणी असणाऱ्या रोहिणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ‘अॅक्टिव्ह’ आहेत. सारण लोकसभा मतदारसंघातील सोनपूर भागात रोहिणी यांच्या स्वागतासाठी झालेली मोठी गर्दी पाहता लालूंना मोठा जनाधार मिळू शकतो, असे काही स्थानिक नागरिकांना वाटते.
निवडणूक प्रचारासाठी फिरणाऱ्या वाहनांवर रोहिणी यांचे फलक लावले आहेत. ही वाहने मतदारसंघातून फिरत आहे. सर्वत्र ‘लालूंची मुलगी’ असे विशेषण तिला लावले जात आहे. रोहिणी यांना पाहण्यासाठी रस्ते, छप्पर आणि गल्लीबोळात महिलाही मोठ्या संख्येने दिसतात. रोहिणी यांना प्रत्यक्ष ओखळणारे खूप कमी लोक येथे आहेत. मात्र, ‘लालूंची मुलगी’ या टॅगलाइनमुळे त्यांच्याभोवती गर्दी होते. रोहिणी यादेखील घराघरांत जातात. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांशी संवाद होतात. सोशल मीडियावर त्यांचे हे ‘व्हिडिओ’ लोकप्रिय झाल्याचे चित्र आहे. राजकारणात कोणताही अनुभव असलेल्या रोहिणी यांना निवडणूक लढविण्यास सांगण्यामागे नक्की काय कारण असावे, याबाबत मात्र बिहारमधील राजकीय तज्ज्ञांमध्ये मतभिन्नता आहे.
रोहिणी यांनी प्रचारादरम्यान बिहारमधील रोजगाराचा मुद्दा उपस्थित केला आहे. सारण मतदारसंघात कोणतेही नवे उद्योग-व्यवसाय आले नसल्याचे त्या प्रचारसभांतून म्हणत आहेत. ‘मोदी अंकल ने जो वादे किये थे वो पुरे नहीं हुये,’ असे त्या म्हणत आहेत. त्यांनी केलेल्या आवाहनाला मतदार किती प्रतिसाद देतात, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. या मतदारसंघातील शहरी भागात राजीव प्रताप रूडी यांना मतदारांचा पाठिंबा मिळताना दिसत असल्याने ‘सारण’ची लढाई लालूकन्येसाठी तितकीशी सोपी नसेल, हे मात्र नक्की.