हायलाइट्स:
- राज्यात आज ५८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू.
- दिवसभरात ३ हजार २७६ नवीन रुग्णांचे निदान.
- करोना रिकव्हरी रेट सध्या ९७.२४ टक्के इतका.
मुंबई: राज्यात करोना संसर्गाचा ग्राफ खाली येत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या आता ३ हजारांपर्यंत खाली आहे. त्याचवेळी मृत्यूचे प्रमाणही कमी होत असून करोना रिकव्हरी रेट सध्या ९७.२४ टक्के इतका आहे. ( Coronavirus In Maharashtra Latest Updates )
वाचा:करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; राज्यात ऑक्सिजनबाबत गाइडलाइन्स जारी
राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येचा उद्रेक पाहायला मिळाला. त्यानंतर गेल्या महिनाभरापासून रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. स्थिती सध्या बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. गेल्या २४ तासांतील आकडेवारी आरोग्य विभागाने प्रसिद्धीस दिली असून राज्यात आज आणखी ५८ करोना बाधित रुग्ण दगावले आहेत तर दिवसभरात ३ हजार २७६ नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्याचवेळी ३ हजार ७२३ रुग्ण करोनावर मात करून रुग्णालयातून घरी परतले आहेत.
वाचा:गणेशोत्सवानंतर राज्यात निर्बंध कधीपर्यंत; सरकारने हायकोर्टात केलं स्पष्ट
दरम्यान, राज्यात करोनाच्या तिसऱ्या लाटेचे अद्याप कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. अहमदनगर जिल्ह्यासह काही भागांत रुग्णसंख्या मोठी असली तरी तितकीशी चिंता करण्याचे कारण नसल्याचे आरोग्य विभागाने नमूद केलेले आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन ऑक्सिजन साठ्याबाबतही उत्पादकांसाठी गाइडलाइन्स जारी करून सरकारने महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत. शाळा, मंदिरे, थीएटर्स उघडण्याबाबत निर्णय घेताना त्यासाठी ऑक्टोबर महिन्यातील तारखा सरकारने निश्चित केल्या आहेत. गणेशोत्सव नुकताच संपला असल्याने पुढचे काही दिवस स्थितीवर लक्ष ठेवून नंतरच सरकार निर्बंधांबाबत पुढची पावले टाकणार हे यामुळे स्पष्ट झाले आहे. मुंबई हायकोर्टातही सरकारकडून अशाप्रकारची माहिती देण्यात आली आहे.
वाचा:२२ ऑक्टोबरपासून राज्यातील सिनेमागृहे व नाट्यगृहे सुरू होणार
करोनाची आजची स्थिती
– राज्यात आज ५८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू.
– सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
– आज राज्यात ३ हजार २७६ नवीन रुग्णांचे निदान.
– दिवसभरात ३ हजार ७२३ रुग्ण बरे होऊन घरी.
– राज्यात आजपर्यंत एकूण ६३,६०,७३५ रुग्ण करोनामुक्त.
– राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ९७.२४ % एवढे.
– आतापर्यंत ५,७९,९२,०१० प्रयोगशाळा चाचण्या पूर्ण.
– एकूण नमुन्यांपैकी ६५,४१,११९ (११.२८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह.
– सध्या राज्यात २,५९,१२० व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये.
– १,४८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
वाचा:शाळा, मंदिरं, थिएटर उघडले; आता नंबर मुंबई लोकल ट्रेनचा!