ड्रेनेज विभागातील काम करण्यासाठी पुणे महापालिकेतील एका महिला अधिकाऱ्यास कार्यकर्त्याच्या फोनवरुन भाजप आमदाराने फोन केला होता. त्यावर संबंधित महिला अधिकाऱ्याने वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल, असं उत्तर दिलं. त्यावर आमदारांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. सध्या ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र, एका वृत्त पत्राला दिलेल्या मुलाखतीत ही ऑडिओ क्लिप दोन वर्षांपूर्वीची असल्याचा दावा संबंधित आमदारांनी केला आहे. तसंच, ही क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल झाली असल्याचंही समजतंय.
वाचाः राजू शेट्टींनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट; ‘हे’ आहे कारण
दरम्यान, या प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. महिलांना सातत्याने कमी लेखणे, पदोपदी महिलांचा अवमान करणे ही भारतीय जनता पक्षाची प्रवृत्ती असून महिला अधिकाऱ्यास शिविगाळ करणारे भाजपचे आमदार हे केवळ त्या प्रवृत्तीचे एक उदाहरण आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केली आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुका येत्या काही काळात येऊ घातल्या आहेत. यानिमित्ताने या निवडणुकीत या ऑडिओ क्लिपचा मुद्द्यावरुन राजकारण तापणार असल्याची शक्यता आहे.
वाचाः भायखळा कारागृहात खळबळ; ३९ कैद्यांना करोनाची लागण