हायलाइट्स:
- पुण्यात घडली धक्कादायक घटना
- वडिलोपार्जीत संपत्तीचा वाद
- औंध परिसरातील घटना
म. टा. प्रतिनिधी, पुणे: वडिलोपार्जीत संपत्तीच्या वादातून सख्या मोठ्या बहिणीला पेटवून देऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार औंधमधील अनुसया सोसायटीत शुक्रवारी दुपारी घडला. या घटनेत महिला गंभीर जखमी असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक करण्यात आली आहे.
शरद मनोहर पतंगे (वय ४५, रा. यशोधन सोसायटी, बिबवेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या घटनेत राजश्री मनोहर पतंगे (वय ४८, रा. अनुसया हौसिंग सोसायटी, औंध) या जखमी असून त्यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शरद आणि राजश्री सख्खे भाऊ बहीण आहेत. त्यांना आणखी एक भाऊ आहे. राजश्री यांचे लग्न झालेले नाही. औंध परिसरातील अनुसया हौसिंग सोसायटीमध्ये त्या राहतात. राजश्री राहत असलेला फ्लॅट हा त्यांच्या आईच्या नाववर आहे. तो फ्लॅटवरून आरोपी शरद व राजश्री यांच्यात वाद सुरू आहे. तो फ्लॅट त्यांच्या नावावर करून देण्यासाठी आरोपी त्यांच्या मागे लागला होता. दोन वर्षांपूर्वी राजश्री यांच्या आई वडिलांचे निधन झाले आहे.
वाचाः मूल होत नाही म्हणून नराधम पतीने केले पत्नीसोबत अमानुष कृत्य; मित्राला घरी आणले अन्…
शुक्रवारी दुपारी शरद हा दारू पिऊन राजश्री यांच्या घरी गेला. त्यावेळी त्या घरात खुर्चीवर आराम करत होत्या. दोघांमध्ये पुन्हा वडिलोपार्जित या फ्लॅटवरून वाद झाले. यावेळी शरद याने राजश्री यांच्या साडीला आग लावून पेटून दिले. त्यावेळी राजश्री यांचा दुसरा भाऊ देखील त्या ठिकाणी होता. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. या घटनेत महिलेची हनुवटी, दोन्ही गाल व मानेपासून पायापर्यंत भाग भाजला आहे. त्यांना तत्काळ उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच चतुःश्रुंगी पोलिसांनी पाहणी करून गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक संदीप पवार हे अधिक तपास करत आहेत.
वाचाः राजू शेट्टींनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट; ‘हे’ आहे कारण
औंधमध्ये तक्रारदार राहत असलेल्या फ्लॅटवरून बहिन भावांमध्ये वाद आहे. आरोपी हा महिलेचा लहान भाऊ आहे. वादानंतर आरोपीने त्यांना पेटवून दिले. यामध्ये त्या ४० टक्के भाजल्या असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.
संदीप पवार, सहायक निरीक्षक, चतुःश्रुंगी
वाचाः भायखळा कारागृहात खळबळ; ३९ कैद्यांना करोनाची लागण