वृत्तसंस्था, अहमदाबाद/नवी दिल्ली : तटरक्षक दलाने गुजरातच्या किनाऱ्याजवळील समुद्रातून एका भारतीय मच्छिमार बोटीवरून १७३ किलो अमली पदार्थ जप्त केले असून, बोटीवरील दोन खलाशांना ताब्यात घेतले आहे. तटरक्षक दलाने सोमवारी अहमदाबाद येथे प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.गुजरातच्या किनाऱ्याजवळ खोल समुद्रात तटरक्षक दल आणि गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने रविवारी दुपारी ही संयुक्त कारवाई केली. एक दिवसापूर्वीच गुजरातच्या किनाऱ्याजवळूनच एका पाकिस्तानी नौकेतून ६०० कोटी रुपये किमतीचे हेरॉइन जप्त करण्यात आले होते. तटरक्षक दल, एटीएस आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या संयुक्त कारवाईत १४ जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच ही दुसरी कारवाई करण्यात आली.
दहशतवादविरोधी पथकाकडून मिळालेल्या विशिष्ट आणि विश्वासार्ह गुप्तवार्तेआधारे, तटरक्षक दलाने आपल्या नौका आणि विमाने तैनात केली होती. समन्वयाने सुरू असलेली सागरी आणि हवाई गस्त चुकवून संशयित बोट पसार होऊ नये, याची खबरदारी घेण्यात आली. योग्यरीत्या ओळख पटवल्यानंतर, या बोटीला रोखण्यात आले. तपासणीअंती, बोटीवरील दोन व्यक्ती १७३ किलो अमली पदार्थांची तस्करी करीत असल्याचे स्पष्ट झाले. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत १७३ किलो हशीश जप्त करण्यात आले, तर दोन भारतीयांना ताब्यात घेण्यात आले.
तटरक्षक दलाने मागील तीन वर्षांत केलेली ही १२वी कारवाई आहे. समुद्रमार्गे होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी तटरक्षक दल व एटीएसने केलेल्या संयुक्त प्रयत्नांचे हे उदाहरण आहे, असे प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.