पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ‘डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड’ (डीआरजी) आणि विशेष कृती दलाचे (एसटीएफ) संयुक्त पथक नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या अबुझमाड या माओवाद्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या भागात माओवादीविरोधी कारवाईसाठी पाठवण्यात आले होते. मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास सुरक्षा दलाचे पथक टेकमेटा आणि काकूर गावांदरम्यानच्या जंगलात असताना माओवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्यास सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले. काही वेळाने सुरक्षा दलांनी घटनास्थळाची झडती घेतली असता तीन महिलांसह १० माओवाद्यांचे मृतदेह सापडले.
माओवाद्यांच्या छावणीतून अनेक शस्त्रे, दारूगोळा आणि एक ‘एके ४७’ रायफलसह दैनंदिन वापरातील वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. मारल्या गेलेल्या माओवाद्यांची ओळख अद्याप पटली नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. सुरक्षा दलांनी गेल्या १५ दिवसांत माओवाद्यांवर केलेला हा दुसरा मोठा हल्ला आहे. राज्यातील माओवादीविरोधी मोहिमेतील हे सर्वांत महत्त्वाचे यश असल्याचे नमूद करून उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी सुरक्षा दलाच्या जवानांचे अभिनंदन केले आहे. माओवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात सामील व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ‘मी पुन्हा एकदा माओवाद्यांना विनंती करतो की, विष्णुदेवजींच्या सरकारला चर्चेद्वारे या समस्येवर तोडगा काढायचा आहे. ज्यांना व्हिडिओ कॉलद्वारे बोलायचे आहे किंवा कोणत्याही मध्यस्थीद्वारे बोलायचे आहे, त्यांना सरकारकडून पुनर्वसनाची चांगली व्यवस्था करून परत येण्याचे आवाहन केले जात आहे. मुख्य प्रवाहात या आणि समाजासोबत पुढे जा. बस्तरमध्ये शांतता नांदावी, विकास बस्तरच्या गावागावात पोहोचावा, हीच माझी प्रार्थना आहे,’ असे शर्मा यांनी म्हटले आहे.
१६ माओवाद्यांचे आत्मसमर्पण
बिजापूर : सुरक्षा दलांच्या कठोर कारवाईच्या पार्श्वभूमीवर बिजापूरमध्ये मंगळवारी १६ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यात शोधासाठी १३ लाखांचे इनाम जाहीर असलेल्या दोन माओवाद्यांचा समावेश आहे.