‘अॅस्ट्राझेनेका’ लशीचे उत्पादन ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने केले गेले. ही लस भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या सहकार्याने ‘कोव्हिशील्ड’ या नावे उत्पादित आणि वितरित केली गेली. फेब्रुवारी महिन्यात लंडनच्या उच्च न्यायालयात अॅस्ट्राझेनेकाच्या लसीविरोधात ५१ जणांनी समूहयाचिका दाखल केली होती. ‘अॅस्ट्राझेनेका’ लस घेतलेल्या या सर्व याचिकाकर्त्यांमध्ये किंवा त्यांच्या आप्तांमध्ये ‘टीटीएस’ची लक्षणे विकसित झाली असल्याचे याचिकाकर्त्यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी सांगितले.
‘टीटीएस’ विकसित झाल्यास ते जीवघेणे ठरू शकते. याचिकाकर्त्यांकडे या लसीमुळे ‘टीटीएस’ विकसित होऊन मरण पावलेल्यांचे मृत्यूचे दाखले आहेत, असे ले डे या विधी संस्थेने सांगितले आहे. अशा प्रकारे आपल्या लसीमुळे ‘टीटीएस’ विकसित होऊ शकतो हे ‘अॅस्ट्राझेनेका’ने एक वर्षानंतर मान्य केले आहे.
‘अॅस्ट्राझेनेका’चे म्हणणे काय?
– ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने विकसित केलेल्या करोनाप्रतिबंधक लसीमुळे रक्तवाहिन्यांत रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात; तसेच त्याच वेळी रक्तातील प्लेटलेटही कमी होऊ शकतात, अर्थात ‘थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसायटोपेनिया सिन्ड्रोम’ (टीटीएस) ही स्थिती निर्माण होऊ शकते.
– ‘अॅस्ट्राझेनेका’ लसीमुळे टीटीएस क्वचितच होऊ शकतो. ‘टीटीएस’ हा आजार ही लस न घेतलेल्यांमध्येही आढळून येतो.
– ‘टीटीएस’च्या बाबतीत रुग्णनिहाय कार्यकारणभाव तपासण्याची आवश्यकता आहे.