छत्तीसगडमधील कोरबा लोकसभा मतदारसंघातील काटघोरा शहरात एका निवडणूक सभेला संबोधित करताना शहा बोलत होते. निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस, देशात दहशतवाद आणि माओवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
‘खोटे बोला, मोठ्याने बोला, जाहीरपणे बोला हा काँग्रेस पक्षाचा एक फॉर्म्युला आहे. मोदींना बहुमत मिळाले, तर आरक्षण हटवले जाईल, असे त्यांचे म्हणणे आहे. माझा एक व्हिडीओ बनवून प्रसारित करण्यात आला आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, तुमच्या आशीर्वादाने मोदीजींना गेली १० वर्षे बहुमत मिळत आहे. मोदीजींनी ना आरक्षण हटवले आहे, ना ते हटवणार आहेत,’ असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम ३७० हटवण्यासाठी, रामजन्मभूमीवर मंदिर बांधण्यासाठी, सीएए लागू करण्यासाठी, तिहेरी तलाक हटवण्यासाठी आणि माओवाद संपवण्यासाठी बहुमताचा वापर केला, असेही शहा म्हणाले.
‘भारतीय राजकारणातून काँग्रेस नष्ट होईल’
नवी दिल्ली : ‘यावेळच्या लोकसभा निवडणुकीत देशातील नागरिक काँग्रेसचा सफाया करतील आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेस विसर्जित करण्याची राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची इच्छा पूर्ण करतील,’ असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी येथे केला. ईशान्य दिल्ली मतदारसंघातील भाजप उमेदवार मनोज तिवारी यांच्या उमेदवारी यात्रेत सामील झाल्यानंतर सिंह उपस्थितांना संबोधित करत होते. ते म्हणाले की, तिवारी यांच्या उमेदवारीसाठी जमलेल्या प्रचंड जनसमुदायावरून हे स्पष्ट झाले आहे की, लोकांनी त्यांना ईशान्य दिल्ली मतदारसंघातून पुन्हा निवडून आणण्याचा निर्णय घेतला आहे.
ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत लोक महात्मा गांधींच्या दोन इच्छा पूर्ण करणार आहेत. त्यापैकी एक म्हणजे भारत जगातील एक मजबूत राष्ट्र बनला पाहिजे. तर महात्मा गांधींची दुसरी इच्छा होती की, स्वातंत्र्यानंतर काँग्रेस विसर्जित व्हावी.
ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश एका नव्या दृष्टीने पुढे जात आहे. भारत हे जगात एक मजबूत राष्ट्र बनले आहे आणि त्याची प्रतिष्ठा वाढली आहे. भारत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर बोलतो तेव्हा संपूर्ण जग त्याचे लक्षपूर्वक ऐकतो.’