कुऱ्हाडी आणि चाकूसह २ घरांवर दरोडा; तालुक्यात भीतीचं वातावरण

हायलाइट्स:

  • दरोडेखोरांनी दोन ठिकाणी दरोडा टाकून माजवली दहशत
  • तीन तोळे सोने घेऊन दरोडेखोर पसार
  • पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

सांगली : मिरज तालुक्यातील सिद्धेवाडी येथे दरोडेखोरांनी दोन ठिकाणी दरोडा टाकून दहशत माजवली आहे. यावेळी दरोडेखोरांच्या मारहाणीत एकजण जखमी झाल्याची घटना घडली. तसंच तीन तोळे सोने घेऊन दरोडेखोर पसार झाले. रविवारी पहाटे घडलेल्या घटनेने मिरज तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

मिरज ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटेच्या सुमारास मिरज तालुक्यातील सिद्धेवाडी गावच्या हद्दीतील खोत मळा आणि खरात वस्ती येथे दोन ठिकाणी दरोडा टाकण्यात आला. खरात वस्तीवरील रावसाहेब रामू खरात यांच्या घरावर पहिला दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. हातामध्ये काठ्या, खुरपे, कुऱ्हाड, चाकू अशी धारधार शस्त्रे घेऊन आलेल्या ६ ते ७ दरोडेखोरांनी खरात यांच्या घरावर हल्ला केला.

शेजारच्या तरुणासोबत चॅटिंग केल्याचा संशय; दिराने केला भावजयीचा खून

दरवाजा, खिडक्यांवर धारधार शस्त्राने व दगडाने मारून दहशत माजवली. यावेळी रावसाहेब खरात यांच्या डोक्याला दगड लागल्याने ते जखमी झाले. दरोडेखोरांनी घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी वस्तीवर आरडाओरडा झाल्याने दरोडेखोरांनी पळ काढला.

खरात वस्तीपासून पुढे जवळच असलेल्या खोतमळ्यात बाबाजी धोंडिबा खोत (वय ५३) यांच्या घरी दरोडेखोरांनी जाऊन दहशत माजवली. सोने आणि पैसे कुठे आहेत, असं विचारत शस्त्रांचा धाक दाखवला. दरोडेखोरांनी बाबाजी खोत व त्यांच्या पत्नी सुशीला खोत यांना मारहाण करून ३ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. यावेळी कोणाला फोन लावू नये म्हणून दरोडेखोरांनी बाबाजी खोत यांच्या घरातील दोन्ही मोबाईल फोडून टाकले.

मिरज ग्रामीण पोलिसांना या घटनांची माहिती मिळाल्यानंतर पहाटे घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र दुपारपर्यंत कोणी हाती लागले नाही. हा दरोडा सराईत टोळ्यांनी टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या दरोड्यात रावसाहेब रामू खरात हे जखमी झाले असून, दोन मोबाईलचे नुकसान व तीन तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची माहिती बाबाजी खोत यांनी दिली आहे.

Source link

sangali crimesangali newsदरोडा प्रकरणसांगलीसांगली पोलीस
Comments (0)
Add Comment