हायलाइट्स:
- शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा
- संजय राऊत यांची जोरदार फटकेबाजी
- शिवसैनिकांना नेमकं काय आवाहन केलं?
पिंपरी : शिरुर लोकसभा आणि पिंपरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर झाला पाहिजे, असं म्हणत संजय राऊत यांनी शिवसैनिकांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.
‘मुंबई-ठाण्याचा महापौर शिवसेनेचा असल्याचा अभिमान आहे. मात्र, पुणे, पिंपरी – चिंचवडमध्ये अस्तित्वासाठी संघर्ष करायला लागतोय, हे चित्र चांगलं नाही. पक्ष कमी पडला, पक्ष बांधणी झाली नाही, असं म्हणणे योग्य नाही. येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर झाला पाहिजे. त्यासाठी तयारीला लागा. प्रभाग दोनचा होणार की तीनचा याचा विचार करत बसू नका, घासून नव्हे तर ठासून निवडून येईल, असा आत्मविश्वास बाळगा,’ असं खासदार संजय राऊत यांनी या मेळाव्यात संबोधित करताना म्हटलं आहे.
अजित पवारांवर मिश्किल शेरेबाजी
उपमुख्यमंत्री अजित पवार शहरातील शिवसैनिकांचे ऐकून घेत नसल्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. ‘दादा आमचं ऐकलं तर बर होईल. नाहीतर गडबड होईल. तसे मुख्यमंत्री आज दिल्लीला गेलेच आहेत,’ अशा मिश्किल शैलीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत भाष्य केलं आहे.
मुख्यमंत्री दिल्लीचा अंदाज घ्यायला गेले आहेत. कारण उद्या आम्हाला दिल्लीवर देखील राज्य करायचं आहे, अशी सारवासारवही राऊत यांनी केली.
दरम्यान, शिवसेनेच्या या मेळाव्याला माजी आमदार रवींद्र मिर्लेकर, जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार श्रीरंग बारणे, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक, राज्य संघटक गोविंद घोळवे, माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शरद सोनवणे, सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, जिल्हाप्रमुख विजय देशमुख, शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, महिला आघाडीच्या जिल्हासंघटक सुलभा उबाळे आदी या वेळी उपस्थित होते.