‘ज्या अकाऊंटवर शहा यांचा व्हिडीओ टाकण्यात आला होता तो रेड्डी यांचा नव्हता, असा दावा रेड्डी यांचे वकील सौम्या गुप्ता यांनी केला. संबंधित अकाऊंट तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांच्या मालकीचे नाही’, असे गुप्ता यांनी दिल्ली पोलिसांच्या तपास अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर सांगितले. तेलंगणमधील धार्मिक निकषावरील मुस्लिम आरक्षण रद्द करण्यास कटिबद्ध असल्याचे विधान अमित शहा यांनी केले होते. मात्र, शहा यांनी सरसकट आरक्षणच रद्द करणार, असे विधान केल्याचे बनावट व्हिडीओत दाखविण्यात आले असून, याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसांनी रेवंत रेड्डी यांच्यासह तेलंगण प्रदेश काँग्रेसच्या पाच जणांना नोटीस बजावली होती.
झारखंड काँग्रेस अध्यक्षांना समन्स
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा बनावट व्हिडीओ टाकल्याप्रकरणी झारखंड काँग्रेसचे अध्यक्ष राजेश ठाकूर यांना दिल्ली पोलिसांनी समन्स बजावले आहे, अशी माहिती पक्षाच्या प्रवक्त्याने बुधवारी दिली. ‘मला मंगळवारी दिल्ली पोलिसांकडून नोटीस मिळाली. पण, मला नोटीस का बजावण्यात आली हे माझ्या समजण्यापलीकडचे आहे. हे अराजकतेशिवाय दुसरे काही नाही’, अशी प्रतिक्रिया ठाकूर यांनी दिली. ‘काही तक्रार असल्यास त्यांनी प्रथम माझ्या सोशल मीडिया अकाऊंटची पडताळणी करावी. निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे आणि प्रचारात माझा सहभाग आहे. अशा परिस्थितीत त्यांनी माझा लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स मागवले आहे. गोष्टींची शहानिशा केल्याशिवाय समन्स पाठवणे योग्य नाही’, असेही ते म्हणाले.