‘प्रज्वल रेवण्णा विदेशात गेले असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस बजावली आहे. या नोटिशीबद्दल आम्ही सर्व बंदरे आणि विमानतळांना माहिती दिली आहे. आरोपीला अधिक वेळ द्यायचा की नाही यासंदर्भात आमचे ‘एसआयटी’ सदस्य कायदेशीर मत घेत आहेत. मात्र, २४ तासांपेक्षा जास्त वेळ देण्याची तरतूद नसल्यामुळे ‘एसआयटी’ त्यांना अटक करण्याचेच पाऊल उचलेल’, असे परमेश्वर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
खासदार प्रज्वल आणि त्यांच्या वडिलांनी आपला लैंगिक छळ केल्याची तक्रार एका महिलेने पोलिसांत केली आहे. दरम्यान, आणखी एका महिलेने प्रज्वल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असल्याचे परमेश्वर यांनी सांगितले.
‘विदेश प्रवासासाठी राजकीय मंजुरी नाही’
नवी दिल्ली : ‘प्रज्वल रेवण्णा यांना जर्मनीला जाण्यासाठी आमच्याकडे राजकीय मंजुरी ना मागितली गेली, ना आम्ही ती दिली. राजनैतिक पासपोर्टधारकांना जर्मनीला जाण्यासाठी व्हिसाची आवश्यक नसते. त्यामुळे साहजिकच व्हिसा नोटही जारी करण्यात आली नव्हती. मंत्रालयाने इतर कोणत्याही देशासाठी व्हिसा नोट जारी केलेली नाही. तसेच पासपोर्ट रद्द करण्यासंदर्भात कोणत्याही न्यायालयाकडून आम्हाला कोणतेही निर्देश मिळालेले नाहीत,’ असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
‘मोदी यांनी माफी मागावी’
शिवमोगा (कर्नाटक) : ‘प्रज्वल रेवण्णा यांनी ४०० महिलांवर बलात्कार करून त्यांच्या व्हिडीओ क्लिप बनवल्या. हे केवळ सेक्स स्कँडल नव्हे, तर व्यापक स्वरूपाचे बलात्कारांचे प्रकरण आहे. अशा बलात्कारी व्यक्तीसाठी मते मागितल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील समस्त महिलांची माफी मागितली पाहिजे’, अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी येथील प्रचारसभेत बोलताना केली. प्रज्वल यांनी काय केले हे ठाऊक असतानाही पंतप्रधान त्यांच्यासाठी मत मागत होते, हे कर्नाटकातील प्रत्येक महिलेला कळायला हवे. केवळ पंतप्रधानच नव्हे, तर गृहमंत्री अमित शहा आणि भाजपच्या सर्व नेत्यांनी या देशातील महिलांची माफी मागावी, असेही राहुल म्हणाले.