सरकार मोबाईल कॉलिंगमध्ये बदल करत आहे. आता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) नवा निर्णय घेतला आहे. याबाबत ट्रायने दूरसंचार कंपन्यांनाही विचारणा केली आहे. या नियमानंतर युजर्सची फसवणूक होणे कठीण होणार आहे. कारण आता कॉलिंगच्या वेळी लवकरच फोन नंबरसोबत नावही दिसणार आहे. एक प्रकारे हे फीचर ट्रू कॉलरच्या दिशेने काम करेल.
कसे काम करेल हे फीचर
ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना यासाठी युजर्सची परवानगी घेण्यास सांगितले आहे. एकदा परवानगी मिळाल्यानंतर, युजर्सना मोबाइल स्क्रीनवर नावासह नंबर दिसेल. म्हणजे अनोळखी कॉलरच्या बाबतीतही तेच होणार आहे. अशा फीचरच्या मदतीने, फसवणूक होण्याची शक्यता देखील लक्षणीयरीत्या कमी होते. घोटाळा करण्यापूर्वी कोणीही अनेकदा विचार करेलआणि तुम्हीही सतर्क व्हाल.
कॉलिंग नेम प्रेझेंटेशन (CNAP)
ट्रायने या सुविधेला ‘कॉलिंग नेम प्रेझेंटेशन’ (CNAP)’ असे नाव दिले आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाकडून सातत्याने निर्णय घेतले जात आहेत. आता तुम्ही विचार करत असाल की हे नाव कसे दिसेल, तर ही सुविधा टेलिकॉम कंपन्यांकडून दिली जाणार आहे. हा लाभ घेण्यासाठी युजर्सची परवानगी घेतली जाईल.
काय होईल फायदा ?
हे नियम लागू झाल्यानंतर नको असलेले कॉल्स आणि फेक कॉल्सपासून सुटका करणे सोपे होईल. कॉलिंग नेम प्रेझेंटेशन सर्व्हिस ॲक्टिव्ह झाल्यानंतर, ग्राहकांना अज्ञात कॉलरचे नाव देखील थेट पाहता येईल. त्याच्या मदतीने तुम्ही फ्रॉड कॉलपासून स्वतःला वाचवू शकाल. पण त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो स्पॅम देखील शोधेल. तथापि, मोबाइल स्क्रीनवर व्यवसाय किंवा कंपनी कॉलचे नाव देखील दिसेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.