म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : ‘पालकांनीच जर आपल्या मुलांची नावे राहुल गांधी किंवा लालूप्रसाद यादव अशी ठेवली असतील, तर त्यांना निवडणूक लढवण्यापासून कोण व कसे रोखणार,’ असा प्रश्न करीत ‘हे त्यांच्या अधिकारांवर आक्रमण ठरेल,’ असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. त्या वेळी प्रसिद्ध नेत्यांची नावे लावून रिंगणात उतरणाऱ्यांविरोधातील याचिकेतील मुद्दा न्यायालयाने अमान्य केला.बड्या नेत्यांची नावे लावून निवडणूक रणधुमाळीत उभे राहणारे, घोटाळेबाज आणि तोतया उमेदवारांना निवडणुकीत भाग घेण्यापासून रोखण्यासाठी पावले उचलण्याची सूचना निवडणूक आयोगाला करावी, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर भूषण गवई यांच्या नेतृत्वाखालील एस. सी. शर्मा आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मात्र, हा मुद्दा न्यायालयाने ग्राह्य न धरल्याने साबू स्टीफन या याचिकाकर्त्याने संबंधित याचिका मागे घेतली.
‘समान नावांच्या उमदेवारांबाबत न्यायालयाचा सवाल ही याचिका सुनावणीलाच योग्य नसल्याचे न्या. गवई यांनी स्पष्टपणे सांगितले.
‘समान नावांच्या उमदेवारांबाबत न्यायालयाचा सवाल ही याचिका सुनावणीलाच योग्य नसल्याचे न्या. गवई यांनी स्पष्टपणे सांगितले.
याचिकाकर्ते साबू स्टीफन यांच्या वकिलांनी याबाबत बाजू मांडली. ‘मतदारांना गोंधळात टाकून निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी अशी नावे असलेले उमेदवार जाणीवपूर्वक उभे केले जातात. अनेक वेळा अशा डमी उमेदवारांमुळे काही नेते फार कमी फरकाने निवडणूक हरले आहेत. न्यायालयाने निवडणूक आयोगाला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत. याद्वारे वस्तुस्थिती तपासता येईल,’ असा दावा त्यांनी केला होता.