बिहारमधील दरभंगा येथे शनिवारी निवडणूक रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी सन २००२च्या गोध्रा ट्रेन जळितकांडाच्या घटनेचा संदर्भ देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, माजी रेल्वेमंत्री आणि राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यांच्यावर ‘सोनिया गांधीच्या काळात ६०हून अधिक कारसेवकांना पेटवणाऱ्या दोषींना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. लालू यांचे नाव न घेता मोदी म्हणाले की, या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळेच बिहारच्या ‘युवराजा’च्या (तेजस्वी यादव) वडिलांनी त्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता.
विरोधी पक्षांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांचे आरक्षण लुटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मोदींनी केला. ते म्हणाले की, या वंचित वर्गांचा विरोधी ‘इंडिया’कडून अपेक्षाभंग झाला आहे. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली संविधान सभेने ७५ वर्षांपूर्वी निर्णय घेतला होता की, आपल्या देशात धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही. पंडित नेहरूंनीही धर्माच्या आधारावर आरक्षणाला विरोध केला होता, पण आता काँग्रेस नेहरूंच्या भावनेच्या विरोधात जात आहे, बाबासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत आणि संविधान तोडण्यात मग्न आहेत.
‘काँग्रेस ओबीसी कोटा कमी करून मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे आणि ‘राजद’ही काँग्रेसच्या या कटात खांद्याला खांदा लावून उभा आहे,’ असा आरोपही त्यांनी केला.
येत्या पाच वर्षांत भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई
सिसाई (झारखंड) : ‘एनडीए सरकारने भ्रष्ट शक्तींचा मुखवटा फाडून टाकला असून, भ्रष्टाचारात गुंतलेल्या सर्वांवर येत्या पाच वर्षांत कायद्यानुसार कारवाई केली जाईल,’ अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे दिली. ‘झारखंडचे माजी मुख्यमंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत; मोदी हे संकट नष्ट करण्यासाठी कटिबद्ध आहेत. पुढील पाच वर्षांत भ्रष्टाचारात गुंतलेल्या सर्वांवर कायदेशीर कारवाई केली जाईल,’ असे ते गुमला येथील सिसाई येथील प्रचारसभेत म्हणाले. लोहरदगा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार समीर ओराव यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
‘रायबरेलीतूनही राहुल पराभूत होणार’
बोदेली (गुजरात) : ‘राहुल बाबा, माझा सल्ला ऐका. समस्या तुमच्यामध्ये आहे, जागांमध्ये नाही. तुमचा रायबरेलीमधूनही मोठ्या फरकाने पराभव होईल. तुम्ही पळून गेलात, तरी लोक तुम्हाला शोधतील,’ अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी यांची मतदारसंघाच्या बदलावरून शनिवारी खिल्ली उडवली. छोटा उदयपूर (एसटी) लोकसभा जागेसाठी भाजपचे उमेदवार जशुभाई राठवा यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. ‘राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस निवडणूक लढवत आहे. अमेठीतून निवडणूक हरल्यावर ते वायनाडला गेले. यावेळी वायनाडमधून हरणार असल्याची जाणीव त्यांना झाली आहे, त्यामुळे ते अमेठीऐवजी रायबरेलीमधूनही निवडणूक लढवत आहेत,’ असेही शहा म्हणाले.