काय आहे प्रकरण?
मारहाण करण्यात आलेले महेंद्र सिंह आग्रा लोकसभा राखीव जागेवरून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. महेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ते निवडणुकीशी संबंधित कामात व्यस्त होते. त्यावेळी शेजारी राहणारा मुलगा राजकुमार आणि त्याचा भाऊ रवी उर्फ छोटू घरात घुसले. त्यांनी घरात घुसत हल्ला केला.
त्यांनी महेंद्र सिंह यांच्या डोक्यावर जड वस्तूने प्रहार केला. चप्पलने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांचे कपडेही फाडले. महेंद्र सिंह म्हणाले की, ते लोक मला निवडणूक लढवण्यापासून रोखत आहेत. ज्या दिवसापासून अर्ज दाखल केला, तेव्हापासून सनी आणि त्याचे कुटुंबीय त्यांचा छळ करत आहेत. मारहाण करणारा सनी त्यांच्या घराजवळ राहतो आणि व्याजावर पैसे देण्याचं काम करतो. सनी परिसरातील लोकांना कर्ज देतो. त्यानंतर तो त्यांच्याकडून ३० ते ४० टक्के व्याज घेतो. यापूर्वी सनीने व्याजाच्या कारणावरुन प्रताप नावाच्या तरुणालाही मारहाण केली होती.
उमेदवार महेंद्र सिंह यांनी असंही सांगितलं, की सनी आणि त्याचे कुटुंबीय त्याला मानसिक त्रास देत आहेत. जेव्हापासून मी निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे, तेव्हापासून ते माझ्याबद्दल खोटा प्रचार करत आहेत. माझ्या निवडणूक लढवण्यात अडथळे आणत आहेत.
मारहाण झाल्यानंतर लोकसभेचे उमेदवार महेंद्र सिंह यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र नंतर त्यांनी ती तक्रार मागे घेतली. यात पैशाच्या व्यवहाराचा मुद्दा होता. दोघांमध्ये परस्पर सामंजस्य करार झाल्यानंतर उमेदवार घरी परतला. मात्र घरी परतल्यावर त्यांनी पंख्याला गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र आजूबाजूच्या लोकांनी दरवाजा तोडून त्यांना वाचवलं.