गावाच्या रक्षणासाठी नोकरी, शिक्षण सोडलं; हिंसाचाराच्या धास्तीने मणिपूरमध्ये तरुणांची सशस्त्र गस्त

वृत्तसंस्था, इम्फाळ/चुराचंदपूर : सकाळ अन् रात्र… दररोज दोन पाळ्यांमध्ये हातात बंदुका घेऊन गस्त घालायची. पण पोटा-पाण्यासाठी किंवा गाठीला चार पैसे जमवण्यासाठी नव्हे तर, मैतेई आणि कुकी समाजातील हिंसक गटापासून स्वतःच्या, कुटुंबाच्या जीवाच्या रक्षणासाठी. त्यासाठी मणिपूरच्या कोटरूक गावाभोवतीच्या रस्त्यांवर दररोज अनेक तरुण गटागटाने सशस्त्र गस्त घालत आहेत. दोन्ही समाजांत उसळलेल्या वांशिक संघर्षाला वर्ष लोटले तरी हिंसाचाराची धास्ती अजूनही त्यांच्या मनात घर करून आहे.

अवघ्या विशीत किंवा तिशीत असणाऱ्या आणि स्वतःला ‘स्वयंसेवक’ म्हणवणाऱ्या मुलांच्या हातात जिथे पुस्तके किंवा लॅपटॉप हवे, त्यांना हातात दिसतात ती शस्त्रे. ज्यांनी उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहायची, तिथे त्यांच्यासमोर केवळ कुटुंबाच्याच रक्षणाचे ध्येय आहे. सैन्य दल आमच्या संरक्षणासाठी काहीच करू शकत नसल्याने आमच्या संरक्षणाची जबाबदारी आम्हालाच उचलावी लागतेय, आम्ही आमच्या क्षमतेनुसार ही जबाबदारी सांभाळत आहोत, असे ते म्हणतात.
मुंबईतून धबधब्यावर गेले, तरुणांची १२० फूटावरुन डोहात उडी; पोहण्यासाठी गेलेला एक वर आलाच नाही, तर दुसरा…
इम्फाळ खोऱ्यातल्या अशा अनेक गावांमध्ये असे ‘ग्राम स्वयंसेवक’, ‘ग्राम स्वयंसेवक दल’, ‘ग्राम संरक्षण दल’ आपल्या गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. ते कोणत्याही सुरक्षा एजन्सी किंवा सशस्त्र दलाशी संबंधित नाहीत. खोऱ्यांत आणि चुराचंदपूर डोंगराळ भागात गणवेशात असलेले हे तरुण वाळूच्या पोत्यांनी बनवलेल्या बंकरमध्ये किंवा काठी, बंदुकांसह सशस्त्र गस्त घालताना दिसतील. या बंदुका देशी असतात किंवा चोरीच्या किंवा तस्करी केलेल्या.

गस्त घालण्याची ड्युटीही रोस्टरप्रमाणे ठरवण्यात आली आहे. प्रत्येक शिफ्ट ही सहा किंवा सात तासांची असते. एका गटात पाच ते सहा जणांचा समावेश असतो. ते महामार्ग, गावातील रस्ते किंवा डोंगर किंवा घनदाट जंगलांकडे जाणाऱ्या अरुंद मार्गावर तैनात असतात. ‘सुरुवातीला आम्ही ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवत होतो, मात्र आता केंद्रीय संरक्षण दलाने जॅमर बसवल्यामुळे आम्हाला पूर्वीसारखी पाहणी करता येत नाही,’ असे एका स्वयंसेवकाने सांगितले.
बस पंक्चर काढण्यासाठी उभी, चिमुकलीचं बसबाहेर डोकं, तेवढ्यात अनर्थ अन्… महामार्गावर धक्कादायक घटना
या सर्वांचे जगण्याचे एकमेव साधन म्हणजे शेती. गावाच्या रक्षणासाठी अनेकांनी नोकऱ्या, शिक्षणाची कास सोडली आहे. त्यांच्या घरांच्या भिंतीवर बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा जागोजागी दिसतात. घरातील तरुण अशी गस्त घालत असताना घरातील महिला, वृद्ध आणि मुलांनी संक्रमण शिबिरांमध्ये आश्रय घेतला आहे.

आश्चर्य म्हणजे स्थानिक अधिकारी यात हस्तक्षेप करत नाहीत. ‘ते जोपर्यंत शस्त्र घेऊन सुरक्षा दल किंवा सरकारी अधिकाऱ्यांसमोर येत नाहीत, तोपर्यंत ठीक आहे. नाहीतर आम्हाला त्यांना परवाना विचारावा लागेल आणि त्यांच्यावर शस्त्रास्त्रे कायद्यानुसार कारवाई करावी लागेल. जोपर्यंत ते शांततेने संरक्षण करत आहेत, तोपर्यंत आम्ही यात हस्तक्षेप करत नाही,’ असे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

२० दिवसांपासून ते दोन महिन्यांचे प्रशिक्षण

गस्त घालणाऱ्या तरुणांना सर्वसाधारण एनसीसी कौशल्याचा समावेश असणारे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण २० दिवसांपासून ते दोन महिन्यांचे असते. त्यात काही देशी बनावटीच्या शस्त्रांचेही प्रशिक्षण दिले जाते. मात्र त्यांना हे प्रशिक्षण देते कोण, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.

‘स्कूल ऑन व्हील’ उपक्रम

संक्रमण शिबिरांमधील मुलांसाठी मणिपूरच्या राज्यपाल अनुसुइया उइके यांनी रविवारी ‘स्कूल ऑन व्हील्स’ या उपक्रमाचा शुभारंभ केला. या कार्यक्रमांतर्गत मुलांना बसमध्ये एका शिक्षकासह वाचनालय, स्मार्ट टीव्ही, कम्प्युटर आणि विविध क्रीडा सुविधांची सोय उपलब्ध असणार आहे.

Source link

Manipur koutruk villagemanipur newsyouth patrolling Manipur koutrukमणिपूर कोटरूक सशस्त्र गस्तमणिपूर बातमी
Comments (0)
Add Comment