मराठा आंदोलनास कारणीभूत ठरलेले कोपर्डी पुन्हा चर्चेत

हायलाइट्स:

  • अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी पुन्हा चर्चेत
  • मराठा आंदोलनाची ठिणगी इथूनच पडली होती
  • संभाजीराजे भोसले उद्या कोपर्डीला जाणार

अहमदनगर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पुकारल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती राज्याच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी (१२) जून रोजी ते नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे भेट देणार आहेत. कोपर्डीतील घटनेपासून मराठा आंदोलन सुरू झाले, मात्र, तेथील निर्भयावरील अत्याचाराचा खटला उच्च न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे. या नव्या आंदोलनात त्याचाही समावेश केला जावा, यासाठी कोपर्डीकरांनी तयारी सुरू केली आहे. (Sambhaji Raje To Visit Kopardi on Saturday)

वाचा:छा-छू काम केलंय! अजित पवारांनी सर्वांसमोरच कंत्राटदाराला सुनावले

कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे शनिवारी दुपारी २ वाजता संभाजीराजे येणार आहेत. यावेळी पीडितेचे कुटुंबीय, ग्रामस्थ आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत, अशी माहिती तात्या सुद्रिक यांनी दिली. कोपर्डी येथील घटनेनंतर एकवटलेल्या मराठा समाजाने राज्यभर मोर्चे काढले. आता पुन्हा एकदा याच गावातून आंदोलन सुरू होत आहे, त्यामुळे प्रमुख कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन समन्वयक संजीव भोर यांनी केले आहे. आपल्या समाजाच्या भावी पिढीसाठी एकत्र येऊन आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही भोर यांनी केले आहे. कोपर्डीत संभाजीराजेंसोबत राज्यातील सर्व प्रमुख समन्वयक व मराठा संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. अहमदनगर जिल्हा व लगतच्या जिल्ह्यांतील मराठा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाचा: ‘बघतो कोण अडवतं ते’ असं म्हणत मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचा एल्गार

नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे जुलै २०१६ मध्ये शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. त्याच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चांचे स्वरूप पुढे बदलत जाऊन मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरकसपणे पुढे आला होता. मधल्या काळात कोपर्डीतील मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणाची सुनावणी नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. त्यामध्ये आरोपींना फाशीची शिक्षा झाली. मात्र, त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून तेथे हा खटला दीर्घकाळ प्रलंबित आहे. घटना घडल्यापासून पेटलेल्या आंदोलनांतून हा खटला फास्ट ट्रॅक पद्धतीने चालविण्याची मागणी होत होती. तत्कालीन सरकारने वेळोवेळी तसे आश्वासन दिले होते. मात्र, सत्र न्यायालयातील टप्पा पार केल्यानंतर या खटल्याची सुनावणी रखडत गेली.

वाचा: जितीन प्रसाद भाजपमध्ये; शिवसेनेनं राहुल गांधींना दिला ‘हा’ सल्ला

आता पुन्हा सुरू होत असलेल्या मराठा आंदोलनात हाही मुद्दा घेण्यासंबंधी गावकरी आणि नगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्या दृष्टीने संभाजीराजेंच्या कोपर्डी दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कोपर्डीतील पीडित कुटुंबीयांशी संवाद, स्मृतिस्थळाला भेटही दिली जाणार असून यावेळी गावकरी हा मुद्दा मांडणार आहेत.

Source link

KOPARDIMaratha Reservationsambhajiraje bhosaleSambhajiraje To Visit Kopardiकोपर्डीमराठा आरक्षणसंभाजीराजे भोसले
Comments (0)
Add Comment