ओवेसींसमोर बालेकिल्ला राखण्याचं आव्हान, तर भाजपकडून धार्मिक-सामाजिक मुद्द्यावर भर

हैदराबाद : चार दशकांपासून हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर वर्चस्व असणाऱ्या ‘एमआयएम’समोर भाजपने यंदा माधवी लता यांच्या रूपामध्ये कडवे आव्हान उभे केले आहे. एका बाजूला भाजपकडून धार्मिक ध्रुवीकरणाच्या आधारावर प्रचाराला धार देण्यात येत आहे. त्याच्या बरोबरीने ‘तिहेरी तलाक’च्या मुद्द्यावरून मुस्लिम महिलांना आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. दुसरीकडे राज्यघटनेच्या बचावापासून सामाजिक सुरक्षा व हैदराबादच्या शांततेचा मुद्दा उपस्थित करून ‘एमआयएम’कडून बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत.

हैदराबाद मतदारसंघात १९८४पासून सुलतान सलाहुद्दीन ओवेसी यांनी विजयाची मालिका सुरू ठेवली आणि २००४नंतर त्यांचे पुत्र असदुद्दीन ओवेसी सातत्याने विजयी होत आले आहेत. गेल्या दोन निवडणुकांमध्ये त्यांचे मताधिक्य दोन लाखांपेक्षा जास्त राहिले आहे. या वेळी त्यांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी भाजपने जय्यत तयारी केली आहे. ‘एमआयएम’ आणि भाजपबरोबरच काँग्रेसकडून महंमद समीर वलीउल्लाह यांना उमेदवारी दिली आहे. मुस्लिम मतदारांची विभागणी होण्याच्या शक्यतेने ओवेसी यांची डोकेदुखी वाढणार आहे.

निवडणुकीच्या मुद्द्यावरून संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू केल्यानंतर, दोन्ही पक्षांच्या समर्थकांकडून विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला. भाजपबरोबरच, राज्यात काही महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या काँग्रेसविषयी राग व्यक्त करताना, रिक्षाचालक शेख रशीद यांनी ओवेसी यांच्या कामांचे कौतुक केले. ‘असदुद्दीन आणि त्यांचे बंधू अकबरुद्दीन दोघेही सामान्य माणसांमध्ये मिसळून राहतात. त्यांच्यामुळे हैदराबाद शहरातील अनेक कामे मार्गी लागली आहेत. त्यामुळे हैदराबादमध्ये ओवेसीच निवडून येणार. अनेक हिंदू मतदारही ओवेसी यांना मतदान करतात,’ असे रशीद ठामपणे सांगत होते. भाजप केवळ आश्वासने देते; तर काँग्रेसने राज्यात सत्तेवर येताना खूप आश्वासने दिली, ती पाळलीच नाहीत. त्यांच्यामुळे शहरातील व्यावसायिकांना व्यवसाय करणे कठीण जात आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
राजकारण: उमेदवाराची प्रतिमा विरूद्ध राष्ट्रीय मुद्दे; सुजय विखे की लंके, अहमदनगरचा गड कोण राखणार?
‘हैदराबादमध्ये या वेळची निवडणूक चुरशीची आहे. सर्वच पक्षांनी इथे जोर लावला आहे. त्यामुळे, निवडणुकीत काय होईल, हे सांगता येत नाही,’ असे ३० वर्षीय इम्तियाज सांगत होता. मात्र, ओवेसी यांनी प्रचारात जोर लावला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

पोथुरी लक्ष्मीनारायण यांनी मात्र माधवी लता यांचे भरभरून कौतुक केले. त्यांच्या प्रचारामुळे ओवेसी यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे आणि ते पायाला चक्री लावल्यासारखे प्रचारासाठी फिरत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘असदुद्दीन ओवेसी यांना चार वेळा संधी मिळाली आहे, आता नव्या माणसाला संधी मिळाली पाहिजे. माधवी लता यांनी काम केले नाही, तर पुन्हा ओवेसी यांना संधी देता येईल की, आतापर्यंतचे वातावरण पाहता, माधवी लता यांचा विजय होईलच. आताचे वातावरण पाहिले, तरी आमच्यासाठी त्या जिंकल्या आहेत.’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही महिन्यांमध्ये सातत्याने हैदराबादचा दौरा केला आहे. त्यांनी केलेल्या रोड शोला जोरदार प्रतिसाद मिळाल्याचे नागरिक सांगतात. त्या वेळी त्यांनी ओवेसी यांचा उल्लेख ‘रझाकार’ असा केला. यावरूनही त्यांच्यावर टीका होत आहे.

बनावट मतदारांचा मुद्दा चर्चेचा

काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने हैदराबाद मतदारसंघातील पाच लाख २४ हजार दुबार मतदारांची नावे वगळली. त्याचबरोबर पाच लाख नव्या मतदारांची नावेही समाविष्ट करण्यात आली. मात्र, भाजपकडून बोगस मतदारांचा मुद्दा लावून धरण्यात येत आहे. ‘एका खोलीच्या घरामध्ये ४०-४० मतदार कसे असू शकतात? याच बोगस मतदारांच्या बळावर ओवेसी निवडून येत होते. आता त्यांना ही मदत असणार नाही,’ असे भाजपचे प्रदेश प्रवक्त एन. व्ही. सुभाष यांनी सांगितले.

५९ टक्के मुस्लिम मतदार

हैदराबाद मतदारसंघामध्ये १९ लाखांपेक्षा जास्त मतदार असून, त्यातील ५९ टक्के म्हणजे ११ लाखांपेक्षा जास्त मतदान मुस्लिम आहे. या मतदारसंघात येणाऱ्या विधानसभेच्या सहा मतदारसंघात एमआयएमचे आमदार आहेत, तर गोशालामहल मतदारसंघातून भाजपचे टी. राजासिंह निवडून आले आहेत. माधवी लता यांनी केलेले सामाजिक काम आणि विरिंची रुग्णालयाच्या माध्यमातून मुस्लिम महिलांनाही केलेली वैद्यकीय मदत याचा फायदा त्यांना होईल, असा भाजपला विश्वास आहे. याशिवाय, माधवी लता यांच्याकडून तिहेरी तलाक, शिक्षण, नोकऱ्या या माध्यमातूनही मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत आहे.

ओवेसींचाही नागरिकांशी संवाद

असदुद्दीन ओवेसी यांनीही मतदारसंघावरील पकड कायम राखण्यासाठी कंबर कसली आहे. ते सातत्याने फेऱ्या काढत असून, थेट नागरिकांशी संवाद साधत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर टीका करताना, ‘बीफ’सारख्या मुद्द्याचा ते आवर्जून उल्लेख करतात; भाजपकडून हैदराबादची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

Source link

asaduddin owaisiAsaduddin Owaisi Vs Madhavi LathabjpHyderabad Lok Sabha Elections 2024lok sabha elections 2024madhavi lathaअसदुद्दीन ओवेसीमाधवी लतालोकसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment