निष्काळजीपणाचा कहर! ठाण्यात करोना लशीऐवजी रेबीजची लस दिली

म. टा. प्रतिनिधी, ठाणेः कळव्यातील आतकोनेश्वरनगर आरोग्य केंद्रामध्ये करोना लसीकरणासाठी गेलेल्या एका व्यक्तीला श्वानदंशाची लस देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघड झाला.

करोनाप्रतिबंधक लशीऐवजी श्वानदंशाची लस देण्यात आल्याचे लक्षात येताच त्या व्यक्तीने प्रभागातील नगरसेवकाला याची माहिती दिली. त्यावर आरोग्य केंद्रात जाब विचारण्यास गेलेल्या नगरसेवकाला उलट उत्तरे देण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन महापालिकेकडून संबंधित डॉक्टर व परिचारिकेला निलंबित करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

ठाणे महापालिकेच्या आतकोनेश्वरनगर येथे एका शाळेमध्ये आरोग्य केंद्र कार्यान्वित असून, बाजूच्या शाळेमध्ये करोना लसीकरणाचे केंद्र आहे. याच परिसरात राहणारे राजकुमार यादव हे सोमवारी करोना लसीकरणासाठी आरोग्य केंद्रामध्ये गेल्यानंतर तेथे त्यांना करोनाप्रतिबंधक लशीऐवजी श्वानदंशाची लस देण्यात आली. कोणत्याही प्रकारची चौकशी न करता झालेल्या या लसीकरणाचा प्रकार लक्षात येताच संबंधित व्यक्तीने याची माहिती स्थानिक नगरसेवकाला दिली. त्यानंतर नगरसेवकाने आरोग्य केंद्रात जाऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावर डॉक्टर राखी तावडे आणि परिचारिका कीर्ती कोपरे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

त्यामुळे या प्रकरणाची महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे तक्रार करण्यात आली. त्यांनी याची गंभीर दखल घेत मंगळवारी याप्रकरणी प्रशासनाला जाब विचारला. त्यानंतर तावडे व कोपरे यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. महापौर म्हस्के यांनीही यासंदर्भात कारवाई करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

Source link

corona vaccinerabies vaccinerabies vaccine was given instead of coronaThane newsकरोना लस ऐवजी रेबीजची लसश्वानदंशाची लस
Comments (0)
Add Comment