राज्यातील या ३ आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे जाहीर केले. धक्कादायक म्हणजे हे सर्व अशा वेळी झाले आहे जेव्हा राज्यातील नेतृत्वात बदल होऊन फक्त २ महिने झाले.
राज्यातील नायब सैनी सरकारचा ज्या अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतला आहे त्यामध्ये पुंडरीचे आमदार रणधीर गोलन, नीलोखेडीचे आमदार धर्मपाल गोंदर, चरखी दादरीचे आमदार सोमवीर सांगवान यांचा समावेश आहे. रोहतक येथे या तिघा आमदारांनी काँग्रेसचे प्रदेश प्रमुख उदयभान यांच्या उपस्थितीत भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे सांगितले. राज्यातील ४ अपक्ष आमदारांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले होते.
नायब सैनी सरकारने आवाजी विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकला होता. २०१९च्या निवडणुकीत ९० सदस्य असलेल्या विधानसभेत भाजपने ४० जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने ३१ तर १० जागांवर जेजेपीने विजय मिळवला होता. ७ जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. एक जागा हरियाणा लोकहित पार्टीतर एक जागा इनेलोला मिळाली होती. सध्या विधानसभेत २ जागा रिक्त आहेत. यात करनाल आणि रानिया मतदारसंघांचा समावेश आहे. अशा स्थितीत विधानसभेतील सध्याची सदस्य संख्या ८८ इतकी आहे.
लोकसभा निवडणूक २०२४मध्ये हरियाणात सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यात भाजप १०, काँग्रेस ९ आणि आम आदमी पक्ष १ जागेवर निवडणूक लढवत आहे.
राज्यातील आणखी एक आमदार राकेश दौलदाबाद यांनी देखील काँग्रेससाठी प्रचार करणार असल्याची घोषणा केली आहे. ते दौलदाबाद गुरुग्रामच्या बादशाहपूरचे आमदार आहेत. राकेश यांनी २०१९ मध्ये भाजपच्या मनीष यादव यांचा पराभव केला होता.