इस्रायली फौजा राफाच्या वेशीवर; गाझा पट्टीतील पॅलिस्टिनींच्या मदतीला फटका बसण्याची भीती

कैरो: इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविरामाबाबत एकीकडे वाटाघाटी सुरू असतानाच, दुसरीकडे इस्रायलच्या फौजा गाझा पट्टीतील दक्षिणेकडील राफा शहरात घुसल्या आहेत. इस्रायली फौजांनी मंगळवारी पॅलेस्टाइन आणि इजिप्तमधील राफा सीमेवर नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळे युद्धग्रस्त गाझामधील पॅलिस्टिनी नागरिकांना मिळणारी मदत थांबण्याची भीती व्यक्त होत आहे.

इजिप्त-कतारच्या मध्यस्थांनी मांडलेला युद्धविरामाचा प्रस्ताव हमासने सोमवारी स्वीकारल्याचे जाहीर केल्यानंतर इस्रायलने या करारात काही मूळ मागण्यांचा समावेश नसल्याचे कळवले होते. त्यानंतर अचानक मंगळवारी इस्रायलने हे पाऊल उचलले आहे. इस्रायलच्या ४०१व्या ब्रिगेडने मंगळवारी पहाटे राफा सीमावर्ती भागात प्रवेश करून या महत्त्वाच्या सीमेचा ताबा घेतला आहे. इस्रायली सैन्याने रात्रभर राफाहच्या सीमेवर हल्ले आणि बॉम्बचा वर्षाव केला. यात सहा महिला आणि पाच मुलांसह २३ पॅलिस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी राफा शहरातील आक्रमणाला विरोध करून इस्रायलला सोमवारी इशारा दिला होता. मात्र तो न जुमानता इस्रायलने घुसखोरी सुरूच ठेवली आहे. इस्रायलने येथेही हल्ला केल्यास इस्रायलच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी राफामध्ये आश्रयाला आलेल्या गाझा पट्टीतील पॅलिस्टिनींसाठी आगीतून फुफाट्यात नेणारी परिस्थिती असेल, असे येथील स्वयंसेवी पथकांचे म्हणणे आहे.

गाझा पट्टीमध्ये सुरू असलेल्या युद्धापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी इजिप्तमध्ये पळून जाण्यासाठी राफा सीमा हा महत्त्वाचा मार्ग आहे. मदतकार्यासाठी महत्त्वाचे ठरणारे इस्रायल आणि गाझा दरम्यानचे राफा आणि केरेम शोलेम हे दोन मुख्य मार्ग गेल्या दोन दिवसांपासून बंद आहेत. काही छोट्या-मोठ्या मार्गांद्वारे मदत पुरवली जात असली तरी राफा सीमा बंद झाल्यास येथे तग धरून राहिलेल्या पॅलिस्टिनी नागरिकांना अन्न, औषध आणि अन्य तातडीच्या वस्तूंचा पुरवठा बंद होण्याची भीती आहे. राफा सीमा बंद झाल्यास याचा फटका मदतमोहिमेला बसणार आहे. गाझामध्ये सर्व इंधनपुरवठा राफा सीमेवरूनच होतो. त्यामुळे त्याला अडथळा झाल्यास संपूर्ण मानवतावादी कामच थांबण्याची भीती संयुक्त राष्ट्राच्या मानवतावादी मदत कार्यालयाचे प्रवक्ते जेन्स लेर्के यांनी व्यक्त केली आहे. अशा वेळी येथील परिस्थिती आणखी बिकट होईल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

‘दहशतवादी कारवायांमुळेच सीमेवर ताबा’

राफाच्या सीमेचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यामुळे ती ताब्यात घेतल्याचा दावा इस्रायलच्या लष्कराने केला आहे. सीमेच्या आजूबाजूच्या भागाचा वापर हल्ला करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप इस्रायली लष्कराने केला आहे. अशाच एका हल्ल्यात रविवारी केरेम शालोम सीमेवर केलेल्या हल्ल्यात चार इस्रायली सैन्य ठार तर, अन्य जखमी झाल्याचे इस्रायलने सांगितले. मात्र त्यासाठी ते कोणताही पुरावा देऊ शकले नाहीत. इस्रायलच्या लष्कराने राफामधील हमासच्या ठिकाणांना लक्ष्य करून भू-कारवाई आणि हवाई हल्ला केल्याचेही लष्करातर्फे सांगण्यात आले.

Source link

gazaisraeli armyIsraeli army in Gazaइस्रायल आणि हमासपॅलेस्टाइन
Comments (0)
Add Comment