Bihar Politics: रुडींचे आता लालूकन्येशी दोन हात; जनता कोणाला देणार साथ?

बिहार: सारण मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचे कारणही तसेच आहे. या मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांची लढाई ‘लालूप्रसाद यादव’ यांच्यासोबत होत आहे. पण थोडे थांबा! ही लढत बाप-लेकीमध्ये होत नसून, या उमेदवाराचे नावच केवळ रोहिणीच्या वडिलांशी म्हणजे लालूप्रसाद यादव यांच्या नावाशी साधर्म्य असलेले आहे. तसे पाहायला गेले, तर रोहिणी यांची खरी लढत ही भाजप उमेदावार माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार राजीव प्रताप रुडी यांच्यासोबत होणार आहे.

सारण मतदारसंघ हा बिहारमधील ‘हाय प्रोफाइल’ मतदारसंघापैकी एक मानला जातो. सन २००८मध्ये सारण हा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यापूर्वी तो छपरा मतदारसंघ होता. सन १९७७मध्ये लालूप्रसाद येथूनच पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून गेले. इतकेच नव्हे या जागेवरून ते चार वेळा खासदार झाले. २००९च्या निवडणुकीतही ते येथून विजयी झाले. आरोपांना न जुमानता गेल्या तीन दशकांपासून लालूप्रसाद यादव आणि राजद यांना इथल्या राजकीय मैदानावर पूर्णपणे पराभूत करण्यात भाजपला यश आले नव्हते. मात्र, चारा घोटाळ्यात दोषी ठरल्यानंतर लालूंना निवडणूक लढवण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे राबडी देवी यांनी २०१४मध्ये या जागेवरून निवडणूक लढवली. मात्र, मोदी लाटेत ‘राजद’ची सर्व समीकरणे उद्ध्वस्त झाली आणि राजीव प्रताप रुडी विजयी झाले.

यंदाच्या निवडणुकीत लालूंची कन्या रोहिणी आचार्य या सारण मतदारसंघातून ‘राजद’च्या तिकिटावर ‘महाविकास आघाडी’च्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. रोहिणी यांनी २९ एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आपले पिता लालूप्रसाद यादव यांना एक किडनी दान केल्यानंतर रोहिणी आचार्य या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. लालूप्रसाद या जागेवरून चार वेळा खासदार झाले. त्यातही २००४मध्ये लालूंनी छपरा (आत्ताचा सारण) लोकसभा मतदारसंघातून राजीव प्रताप रुडी यांचाच पराभव केला होता. पण, गेल्या दोन निवडणुकांपासून ही जागा भाजपकडे आहे. या जागेवर रोहिणी यांची थेट लढत राजीव प्रताप रुडी यांच्याशी असल्याचे मानले जाते.

रोहिणी यांच्या विरोधात उभे असलेले लालूप्रसाद यादव हे सारण जिल्ह्यातील मढौरा ब्लॉकमधील जाडो रहीमपूरचे रहिवासी आहेत. त्यांनी २६ एप्रिलला राष्ट्रीय जनसंभावना पक्षाचे (राजप) उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. लालू प्रसाद यादव यांनी यापूर्वी सन २०१७मध्ये राष्ट्रपती पदासाठीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु, त्यांच्याकडे पुरेशा प्रमाणात अनुमोदक नसल्याने त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता. सन २००१पासून ते सातत्याने अर्ज भरत आहेत.
सन्मान मिळेना, भाजपचा माजी खासदार अपक्ष रिंगणात; चर्चेनंतर माघार, पण तरीही टेन्शन कायम
सारण लोकसभा मतदारसंघातील शहरी भागात भाजप आणि रुडी यांना मोठा पाठिंबा आहे. पण, ग्रामीण भागांत तसा तो दिसत नाही. या जिल्ह्यातील जातींचे गणित पाहिले, तर सारण मतदारसंघात यादवांची लोकसंख्या २५ टक्के, राजपूत मतदारांची संख्या जवळपास २३ टक्के असून, बनिया मतदार २० टक्क्यांच्या आसपास आहे. तर मुस्लिम मतदारही १० टक्क्यांहूनपेक्षा अधिक आहेत. सारण लोकसभा मतदारसंघात एकूण १२ लाख ६८ हजार ३३८ मतदार आहेत. रुडी हे उच्चशिक्षित असून, लोक त्यांना इथे प्रोफेसर म्हणून ओळखतात. शहरी भागात त्यांनी विकास केला असल्याचे मतदारांचे म्हणणे आहे. मात्र ग्रामीण भागातल लोकांची विशेषतः तरुणांची त्यांच्यावर नाराजी आहे. आमच्याशी हस्तांदोलन केल्यानंतर ते हात सॅनिटायझरने स्वच्छ करतात, असा आरोपही या तरुणांकडून केला जातो. भाजपने तिकीट वाटपात एकाही महिलेला किंवा मुस्लिमालाही तिकीट दिलेले नाही, असेही येथील मतदारांकडून सांगितले जाते. यंदा मतदार कोणाच्या पदरात टाकणार आहे हे पाहणे उत्सुकतचे ठरणार आहे.

रोहिणी आचार्य (राजद)
रोहिणी या लालू प्रसाद यादव यांच्या कन्या आहेत. या निवडणुकीत त्यांच्या पाठीशी लालूंच्या पाठबळासोबत बिहारमधल्या तरुणाईचा चेहरा म्हणून समोर येत असलेल्या तेजस्वी यादव या भावाचाही करिष्मा असेल.

राजीव प्रसाद रुडी (भाजप)
राजीव प्रसाद रुडी येथून चार वेळा निवडून आले आहेत. गेल्या दोन निवडणुकांप्रमाणे यंदा मोदी लाट प्रखर नसली तरी मोदींची पुण्यायी आणि त्यांनी केलेली कामे त्यांना तारून नेण्यासाठी उपयोगी पडतील.

Source link

bihar politicslalu prasad yadavRohini Acharyarohini acharya vs rajiv pratap rudySaran Lok Sabha Electionssaran lok sabha elections 2024
Comments (0)
Add Comment