बीआरएसला चिंता ‘आउटगोइंग’ची; दहा मतदारसंघांत भाजप, कॉंग्रेसचे उमेदवार ‘केसीआर’चे साथीदार

हैदराबाद : विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे तेलंगणमधील सत्ता गमावतानाच, भारत राष्ट्र समितीसमोर (बीआरएस) पक्षातील नेत्यांच्या ‘आउटगोइंग’चे मोठे आव्हान उभे राहिले आहे. राज्यातील दहा मतदारसंघांमध्ये भाजप किंवा काँग्रेस यांचा उमेदवार ‘बीआरएस’मधूनच आला आहे. त्यामुळे, या मतदारसंघांमध्ये नवा चांगला उमेदवार निवडण्याबरोबरच, अन्य पक्षामध्ये गेलेल्या नेत्यामुळे पक्षाच्या मतांमध्ये फूट पडणार का, याची चिंता ‘बीआरएस’च्या नेतृत्वाला सतावत आहे.

डिसेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ‘बीआरएस’चा पराभव झाला. त्यानंतर ‘बीआरएस’चे नेते अन्य पक्षामध्ये जाण्यास सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी ‘बीआरएस’च्या पाच खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली, तर काही महिन्यांपूर्वी निवडून आलेले आमदारही पक्षातून बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. स्थानिक स्वराज संस्थांतील लोकप्रतिनिधीही पक्षांतराच्या तयारीत असून, लोकसभा निकालानंतर ते पक्षातून बाहेर पडतील, असे सांगण्यात येत आहे.

‘बीआरएस’कडून पक्षांतरामुळे खूप मोठा फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया देण्यात येत आहे. ‘बीआरएसची राज्यातील स्थिती अतिशय मजबूत असून, विधानसभा निवडणुकीत १.८ टक्के मतांच्या फरकामुळे पक्षाचा पराभव झाला. जनतेमध्येही ‘बीआरएस’विषयी सहानुभूती दिसत आहे,’ असे पक्षाचे नेते पोन्नला लक्ष्मय्या यांनी सांगितले. ‘काँग्रेस आणि भाजपला उमेदवार मिळत नसल्यामुळे त्यांना ‘बीआरएस’च्या नेत्यांवर अवलंबून राहावे लागत आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.

नामांतरानंतर नाराजी

के. चंद्रशेखर राव यांची राष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाकांक्षा वाढल्यानंतर त्यांनी पक्षाचे नाव तेलंगण राष्ट्र समितीऐवजी भारत राष्ट्र समिती केले. हा निर्णय अनेक नेत्यांना रुचला नाही आणि त्यातून पक्षाची अस्मिताच पुसली गेली, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पुन्हा तेलंगण राष्ट्र समिती असे नामकरण करावे, अशी मागणी स्थानिक नेत्यांकडून होत आहे. तर, ‘तेलंगण राष्ट्र समितीऐवजी भारत राष्ट्र समिती असे पक्षाचे नामांतर करणे, ही चंद्रशेखर राव यांची खूप मोठी चूक होती. त्यांची ताकद मर्यादित असताना, त्यांनी राष्ट्रीय राजकारणाची महत्त्वाकांक्षा ठेवणे अव्यवहार्य होते, त्याचा फटका बसून त्यांची पक्षसंघटना विस्कळित झाली,’ असे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक के. सी. सुरी यांनी म्हटले आहे.

भाजपला वाढीव मतदानाची आशा

आठ ते नऊ मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांची पार्श्वभूमी ‘बीआरएस’ची आहे. तेलंगणमध्ये भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा आणि काँग्रेसचे राज्यातील अपयश या मुद्द्यांवरून प्रचार करत आहे. त्याला जोड म्हणून ‘बीआरएस’च्या मतपेढीतील काही टक्के मते आपल्या बाजूने वळवू शकेल, असा उमेदवार हवा, या दृष्टीने भाजपकडून ‘बीआरएस’च्या उमेदवारांना आपल्या बाजूने वळवण्यात आले आहे. यामध्ये त्यांना दोन खासदारांना आपल्या बाजूने वळवण्यात यशही आले आहे. त्यातील बी. बी. पाटील जहिराबाद मतदारसंघातून रिंगणात आहेत.
मटा ग्राउंड रिपोर्ट: कॉंग्रेसच्या सहा हमींभोवतीच प्रचाराचे केंद्र; जनतेच्या फसवणुकीचा विरोधकांचा आरोप
‘बीआरएस’चे ‘गयाराम’

वारंगळ : ‘बीआरएस’चे आमदार कदियम श्रीहरी यांची मुलगी कदियम काव्या काँग्रेसकडून रिंगणात आहे. त्यांच्याविरुद्ध भाजपकडून अरुरी रमेश आहेत. अरुरी रमेश वर्धनपेठ मतदारसंघातून दोन वेळा ‘बीआरएस’कडून आमदार झाले आहेत.
आदिलाबाद : काही दिवसांपूर्वी ‘बीआरएस’मधून आलेल्या माजी खासदार गोडेम नागेश यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.
चेवेल्ला : विद्यमान खासदार जी. रणजित रेड्डी ‘बीआरएस’मधून काँग्रेसमध्ये आले आहेत; तर २०१४मध्ये ‘बीआरएस’कडून निवडून आलेले कोंडा विश्वेश्वर रेड्डी यंदा भाजपचे उमेदवार आहेत.
जहिराबाद : ‘बीआरएस’चे विद्यमान खासदार बी. बी. पाटील भाजपकडून रिंगणात.
नागरकुर्नूल : ‘बीआरएस’चे विद्यमान खासदार रामुलू भाजपमध्ये आले असून, त्यांचा मुलगा भारत भाजपचा उमेदवार आहे.
मेहबुबाबाद : ‘बीआरएस’चे माजी खासदार सीताराम नाईक भाजपचे उमेदवार.
मलकाजगिरी : ‘बीआरएस’चे माजी आमदार आणि चंद्रशेखर राव यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री राहिलेले एटला राजेंद्र भाजपचे उमेदवार.
सिकंदराबाद : ‘बीआरएस’चे माजी आमदार दनम नागेंद्र यांना काँग्रेसची उमेदवारी.
भोगनीर : ‘बीआरएस’चे माजी खासदार बुरा नरसैया यांना भाजपचे तिकीट.
नालगोंडा : ‘बीआरएस’चे माजी आमदार सैदी रेड्डी भाजपकडून रिंगणात.

Source link

assembly electionsbjpBRSCongresshyderabadKCRlok sabha electiosn 2024
Comments (0)
Add Comment