कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व शिवकुमार यांनी लोकसभा निवडणुकीपू्र्वी प्रज्वल प्रकरणाचे तब्बल २५ हजार पेन ड्राइव्ह (ज्यात हे व्हिडीओ आहेत) सहेतूक वितरित केले, असा आरोप कुमारस्वामी यांनी केला होता. कुमारस्वामी यांना प्रत्युत्तर देताना शिवकुमार यांनी त्यांना ‘ब्लॅकमेलिंगचे बादशहा’ असे संबोधले. या सर्व प्रकरणात कुमारस्वामी यांचीच मुख्य भूमिका असून, तेच या कथेचे निर्माता व दिग्दर्शकही आहेत, असा आरोप शिवकुमार यांनी केला.
कुमारस्वामी यांना या पेन ड्राइव्ह प्रकाराबाबत पूर्णपणे माहिती आहे. एका वकिलासह अन्य काही लोकांनीही यास पुष्टी दिली आहे. ते माझा राजीनामा मागत आहेत. वोक्कालिगा समाजाचे नेतृत्व करण्यावरून स्पर्धा निर्माण झाली आहे, असे दिसते. ठीक आहे, त्यांच्या मागणीनुसार मी राजीनामा देतो, अशा शब्दांत शिवकुमार यांनी कुमारस्वामींची खिल्ली उडवली.
विरोधकांची राजकीय कारकीर्द संपवणे हाच त्यांचा धंदा आहे. अधिकारी, राजकीय नेते आदी सर्वांना ते नेहमी धमकावतात. त्यांना त्यांचे काम करू दे. यावर इथे चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. या प्रकरणावर विधानसभेत चर्चा करू, असे ते म्हणाले.
जनता दल सेक्युलरचे खासदार असणाऱ्या प्रज्वल रेवण्णा यांनी लोकसभेच्या मतदानानंतर विदेशात पलायन केले आहे. प्रज्वल यांचे वडील व जनता दल सेक्युलरचे नेते, आमदार एच. डी. रेवण्णा यांना पोलिसांनी अटक केली आहे.
‘त्या’ व्यक्तीवर कारवाई का नाही?
बेंगळुरू : प्रज्वल प्रकरणाचे व्हिडीओ व्हायरल करण्यात येणार आहेत, असे जाहीर विधान करणारे नवीन गौडा यांच्यावर पोलिसांनी कारवाई का केली नाही, असा प्रश्न कुमारस्वामी यांनी बुधवारी कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांना उद्देशून उपस्थित केला. प्रज्वल प्रकरणातील व्हिडीओ काही सेकंदात व्हायरल करण्यात येत आहेत, असे गौडा यांनी २१ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता जाहीरपणे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी म्हटल्यानुसार ते व्हिडीओ व्हायरल झाले, असे कुमारस्वामी म्हणाले. या व्हिडीओ प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने २८ एप्रिल रोजी विशेष तपास पथकाची स्थापना केली होती.
रेवण्णा यांच्या कोठडीत वाढ
बेंगळुरू एका महिलेचे अपहरण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले आमदार एच. डी. रेवण्णा यांना १४ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. नगर दंडाधिकाऱ्यांनी बुधवारी हा निकाल दिला. चार दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर बुधवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी सत्र न्यायालयात त्यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज, गुरुवारी सुनावणी होणार आहे.