अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी हैदराबाद लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार माधवी लतांच्या समर्थनार्थ प्रचारसभा घेतली. या सभेतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘१५ सेकंदांसाठी पोलिसांना बाजूला करा. ओवैसी बंधूंना कळणारही नाही ते कुठून आले आणि कुठे गेले,’ असं विधान राणा यांनी सभेत केलं.
‘एक लहान आणि एक मोठा भाऊ आहे. लहान भाऊ म्हणतो, पोलिसांना १५ मिनिटांसाठी हटवा, मग आम्ही दाखवतो आम्ही काय करु शकतो. त्या लहान भाऊला मला सांगायचंय, तुला १५ मिनिटं लागतील. आम्हाला तर केवळ १५ सेकंद लागतील. १५ सेकंदांसाठी पोलिसांना बाजूला करा. लहान-मोठ्याला कळणारही नाही कुठून आले आणि कुठे गेले. आम्हाला केवळ १५ सेकंद पुरेशी आहेत,’ असं राणा म्हणाल्या. हा व्हिडीओ राणा यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी अकबरुद्दीन ओवैसी आणि असदुद्दीन ओवैसी यांना टॅग केलं आहे.
नवनीत राणा यांच्या विधानावरुन एमआयएमचे प्रवक्ते वारिस पठाण यांनी पलटवार केला आहे. ‘भाजपचे नेते निवडणूक सुरु असताना अशी विधानं करत आहेत. यामुळे नियमांचं, आचारसंहितेचं उघडपणे उल्लंघन होत आहे. निवडणूक आयोगानं या प्रकरणी कठोर कारवाई करायला हवी. या विधानामुळे दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो,’ असं पठाण म्हणाले.
नवनीत राणा यांच्यासारखी विधानं मी केली असती, तर आज मी तुरुंगात असतो, असं पठाण यांनी म्हटलं. ‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला करा, असं विधान अकबरुद्दीन ओवैसींनी केलं होतं. त्यानंतर ते स्वत: पोलिसांच्या स्वाधीन झाले. ४० ते ४२ दिवस तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला. मग त्यांनी न्यायालयात लढा दिला. मग या प्रकरणातून त्यांची सुटका झाली. आता तसंच विधान राणांनी केलं आहे. निवडणूक आयोग त्यांच्यावर कारवाई कधी करणार? त्यांना तुरुंगात कधी पाठवणार?, असे प्रश्न पठाण यांनी उपस्थित केले आहेत.