कोव्हिड प्रतिबंधक लस घेतल्यानंतर रक्तात गुठळ्या होणे आणि रक्तातील ‘प्लेटलेट’ कमी होण्यासारखे दुष्परिणाम झाल्याचे कंपनीने काही दिवसांपूर्वीच मान्य केले होते. त्यानंतर त्यांनी बुधवारी लशीचा साठा परत मागविण्याची घोषणा केली. करोनावर आणखी अद्ययावत लशी उपलब्ध असल्याने लशी परत मागविण्यात आल्या आहेत, असे कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
‘अॅस्ट्राझेनेका’ने भारतात सीरम इन्स्टिट्यूटशी लशींसाठी भागीदारी केली आहे. कोव्हिशिल्डचे उत्पादन आणि पुरवठा डिसेंबर २०२१पासून थांबविण्यात आला असून, या लशीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती लशींच्या पॅकेटमध्ये दिल्याचे ‘सीरम’ने स्पष्ट केले आहे. अॅस्ट्राझेनेकाने कोव्हिडवर लसनिर्मिती करण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाशी भागीदारी केली होती. भारतात कोव्हिशिल्ड या नावाने विक्री होत असलेल्या लशीची कंपनीकडून युरोपात व्हॅक्स्झेव्हरिया या नावाने विक्री केली होती.
लशींचा जादा साठा
‘जगात विविध अद्ययावत कोव्हिडप्रतिबंधक लशी उपलब्ध असल्यामुळे लशींचा जादा साठा झाला आहे. त्यामुळे व्हॅक्स्झेव्हिरियाच्या मागणीतही घट झाली आहे. त्यामुळे त्याचे उत्पादन व पुरवठा थांबविण्यात आला आहे. हे सारे थांबवण्यासाठी आम्ही नियंत्रक आणि आमच्या भागीदारांसोबत काम करणार आहोत,’ असे कंपनीने निवेदनात म्हटले आहे.