नवनीत राणांच्या विधानाला एमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसींनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मी मोदींना सांगतोय की तुम्ही १५ सेकंद द्या. १५ सेकंद नको, एक तास द्या. आम्ही तयार आहोत. आम्ही घाबरणारे नाही. तुमच्यात किती मानवता शिल्लक राहिली हे आम्हीदेखील पाहू इच्छितो. आम्हाला सांगला कुठे यायचंय. आम्ही येऊ,’ असं प्रतिआव्हान ओवैसींनी दिलं आहे.
नवनीत राणा अमरावतीमधून निवडणूक हरणार आहेत. त्यांच्या विधानातून तेच दिसून येतंय. निवडणूक आयोगानं आणि पोलिसांनी त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, असं एमआयएमचे नेते वारिस पठाण म्हणाले. ‘अमरावतीतून पराभव होणार असल्याची जाणीव राणांना झाली आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून अशी विधानं केली जात आहेत. पोलीस, निवडणूक आयोग त्यांच्या विरोधात कारवाई का करत नाही? या प्रकरणात कठोर कारवाई व्हायला हवी. त्यांच्याकडून (भाजप) ध्रुवीकरणाचे, सामाजिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत,’ असा आरोप पठाण यांनी केला.
भाजपकडून द्वेषाचं राजकारण सुरु असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. समाजात विष कालवण्याचा प्रयत्न सुरु आहे. भाजप प्रत्येक निवडणुकीत असेच प्रकार करते, असंही चव्हाण म्हणाले.