हायलाइट्स:
- राज्यातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य
- राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू
- मनसे नेते अमित ठाकरे यांनी डागली सरकारवर तोफ
मुंबई: पुढील वर्षी होऊ घातलेल्या राज्यातील महत्त्वाच्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरी सुविधांचे प्रश्न चर्चेला येऊ लागले आहेत. विशेषत: रस्त्यावरील खड्डे हा प्रश्न सध्या कळीचा बनला आहे. त्या-त्या शहरातील विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. मुंबई, ठाण्यातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भारतीय जनता पक्षानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही हा मुद्दा हाती घेत सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. (MNS Leader Amit Thackeray attacks state government over potholes on road)
मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून रस्त्यांच्या स्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे होणारे ट्रॅफिक जॅम, अपघात, वाया जाणारे इंधन या गोष्टींमुळं अगदी सर्वांचंच कंबरडं मोडलंय, पण सत्ताधारी राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या भ्रष्टाचारी आघाडीला त्याच्याशी काही देणंघेणं नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्डेविरोधी आंदोलनं करतोय,’ असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. ‘खड्डयांबाबत उच्च न्यायालयातही वारंवार खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होऊ शकेल,’ असा विश्वासही अमित यांनी व्यक्त केला आहे.
२४ वर्षांत २१ हजार कोटी खड्ड्यात घातले!
खड्ड्यांच्या मुद्द्यावरून भाजपनं शिवसेनेवर हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. ‘गेल्या २४ वर्षांत २१ हजार कोटी खड्ड्यात घातले, तरी मुंबईतील रस्त्यांचे ‘रस्ते’ लागले. आता धावते दौरे करून, कारवाई करत असल्याची ओरड करून काय सांगताय? तेच कंत्राटदार, त्याच निविदा आणि तीच थूकपट्टी… मुंबईकरांना हे कसं पटणार?,’ असा सवाल भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे. ‘कंत्राटदारांवर कारवाई करा असं म्हणायचं आणि पाठीमागच्या दारानं बिलं काढून कट-कमिशन खायचं. सब गोलमाल है!,’ असा आरोपही शेलार यांनी केला आहे.