हायलाइट्स:
- पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
- शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची केली मागणी
- पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचा राज ठाकरेंना टोला
नाशिक: अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेल्या पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी खोचक टोला हाणला आहे. ‘राज ठाकरेंनी मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही. मागणी करणं सोपं आहे,’ असं पाटील एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
नाशिक दौऱ्यावर असलेल्या गुलाबराव पाटील यांना पत्रकारांनी राज्यातील पूरस्थिती व विरोधकांकडून होणाऱ्या मदतीच्या मागणीबद्दल प्रश्न केला होता. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचीही त्यांना आठवण करून देण्यात आली. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ‘राज ठाकरे यांनी मागणी केली हे मान्य आहे, पण मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही. मागणी करणं सोपं आहे, असं ते म्हणाले. ‘शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय पंचनाम्यानंतरच घेतला जाईल. प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती पाहून ओला दुष्काळ जाहीर केला जाईल. कुणीही या प्रश्नात राजकारण करू नये,’ असं आवाहनही त्यांनी केलं.
राज ठाकरे यांनी काय मागणी केलीय?
‘महाराष्ट्राच्या काही भागात, मुख्यत: मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसानं कहर केला असून हातातोंडाशी आलेलं पीक गेलं आहे. घरादारांचंही नुकसान झालेलं आहे. ही वेळ आणीबाणीची आहे. अशा वेळेस पंचनाम्याचे सोपस्कार होत राहतील, परंतु त्याआधी प्रत्येक नुकसानग्रस्त घराला आणि शेतकऱ्याला ५० हजार रुपयांची मदत सरकारनं ताबडतोब जाहीर करावी आणि प्रत्यक्षात ती द्यावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. आधी करोना संसर्ग आणि नंतर अतिवृष्टी यामुळे शेतकरी पार कोलमडला आहे. अशावेळी निव्वळ आश्वासनं आणि शब्दांपेक्षा शीघ्र कृतीची गरज आहे. ‘प्रशासकीय पातळीवर नंतर पंचनामे होत राहतील. त्यात शेतीच्या नुकसानीबरोबरच घरांच्या व पाळीव गुरांच्या नुकसानीचाही विचार होईल आणि रितसर मदत जाईल. परंतु, मी ज्या काहींशी बोललो त्यानुसार, तोपर्यंत वाट पाहण्याएवढी ताकद आत्ता शेतकरी बांधवांकडं नाही, ह्याचा विचार करावा. राज्यातील ही स्थिती पाहता शासनानं ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.
आणखी वाचा:
‘जलयुक्त शिवार’मुळं मराठवाड्यात पूर; पर्यावरणतज्ज्ञांचा स्पष्ट आरोप
काकांनंतर पुतण्याचाही केंद्र सरकारवर निशाणा; रोहित पवार म्हणाले…
‘केंद्र सरकार काही राज्यांना न मागता हजारो कोटींचे पॅकेज देते’