गेल्या दोन आठवड्यात अनेक मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. यात प्रामुख्यानं दोन सिनेमांमध्ये स्पर्धा पाहायला मिळाली. महेश मांजरेकर यांचा ‘जुनं फर्निचर’ आणि परेश मोकाशी लिखित-दिग्दर्शित ,मुक्ता बर्वे, नम्रता आवटे अभिनीत ‘नाच गं घुमा’ हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये गर्दी खेचनाता दिसत आहेत. गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या बिग बजेट बॉलिवूड सिनेमांना प्रेक्षकांनी नाकारल्यानंतर मराठी सिनेमांचं काय होणार? असा प्रश्न होताच. पण या प्रश्नाला प्रेक्षकांनीच सकारात्मक उत्तर दिलंय. मराठी सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.
‘नाच गं घुमा’
या सिनेमात मुक्ता बर्वे आणि नम्रता आवटे यांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना आवडतेय. हलकाफुलका विषय असल्यानं कुटुंबासोबत सिनेमा पाहायला गर्दी होतेय. या सिनेमानं प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी २.१५ कोटींची कमाई करत जोरदार ओपनिंग केलं होतं. तर दुसऱ्या दिवशी ८० लाख, तिसऱ्या दिवशी ९५ लाखांची कमाई केली होती. वीकेंडला या ,सिनेमाच्या कमाईत चांगलीच भर पडली होती. sacnilk च्या आकड्यांनुसार सिनेमानं आठ दिवसात ९.९३ कोटींचा गल्ला जमवला आहे. येत्या वीकेंडला या सिनेमाच्या कमाईत आणखी भर पडेल असं दिसून येतंय.
‘जुनं फर्निचर’
तर महेश मांजरेकरांच्या जुनं फर्निचर सिनेमाची कमाई आता मात्र घटल्याचं दिसून येतं. १३ दिवसांत सिनेमानं केवळ ६.८८ कोटींची कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यात सिनेमानं ४.०५ कोटींची कमाई केली होती. मात्र आता सिनेमाच्या कमाईत म्हणावी तशी वाढ झाली नसल्याचं आकडे सांगत आहेत.
गेल्या महिन्याभरात अनेक मराठी सिनेमे प्रदर्शित करण्यात आले .‘स्वरगंधर्व सुधीर फडके’, ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’, ‘परंपरा’, ‘मायलेक’सारख्या मराठी सिनेमांना प्रेक्षकांनी फार प्रतिसाद दिला नसल्याचं दिसून आलं.