कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. जळगाव जिल्ह्यात अधिकाधिक पात्र नागरीकांचे लसीकरण करून घेण्यासाठी लसीकरण मोहीम मिशन मोडवर राबवावी असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले.
जिल्हाधिकारी राऊत यांनी ३०सप्टेंबर रोजी सायंकाळी कोविड-१९ लसीकरण आढावा बैठक ऑनलाइन आयोजित केली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी राऊत बोलत होते. जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण,जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार,तालुका वैद्यकीय अधिकारी,वैद्यकीय अधिकारी ऑनलाइन सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून पुरेश्या प्रमाणात आता लस उपलब्ध होत आहे. करीता प्राप्त झालेला लस साठा दोन दिवसांच्या आत वापर होईल,असे नियोजन करावे. त्यासाठी अधिकाधिक लसीकरण सत्रांचे आयोजन करावे,लसीकरण करतांना ज्येष्ठ नागरीक,सहव्याधी रुग्ण,दिव्यांग व्यक्ती,गर्भवती महिला,तरुणांचे प्राधान्याने लसीकरण होईल अशी दक्षता घ्यावी त्याच बरोबर ज्या गावांत कोरोना विषाणु बाधित रुग्ण आढळून आल्यास त्या संपूर्ण गावांचे लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करावे. ज्या नागरीकांनी कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेवून ८४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे, अश्या नागरिकांची यादी आशा वर्कर,अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून तयार करून त्यांना तातडीने दुसरा डोस देण्यात यावा. आरोग्य विभागाने लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे,जळगाव जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेने एकाच दिवशी १लाख ४५ हजार नागरीकांचे लसीकरण केले आहे. ही आरोग्य यंत्रणेच्या दृष्टीने जमेची बाब आहे,या पार्श्वभूमीवर यापुढे प्राप्त होणारा लस साठा ३६ तासांच्या आत पात्र नागरीकांना देण्यात येईल असे नियोजन करावे,त्यासाठी आवश्यकतेनुसार लसीकरण सत्र वाढवावेत.
भुसावळ तालुक्यात लसीकरण मोहीम व्यापक स्वरुपात राबविण्यासाठी रेल्वेच्या इस्पितळाची मदत घ्यावी. याशिवाय कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवावी,प्रत्येक तालुक्यातून दररोज किमान पाचशे चाचण्या कराव्यात,त्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करावे,ज्येष्ठ नागरिक दिनाच्या पार्श्वभूमीवर दि. २ऑक्टोबर रोजी आयोजित होणाऱ्या लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठ नागरीकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी,अश्या सूचनाही जिल्हाधिकारी राऊत यांनी दिल्या.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ऑक्टोबर २०२१ रोजी होणाऱ्या ग्रामसभेच्या माध्यमातून लसीकरणाबाबत जनजागृती करावी,त्यासाठी गटविकास अधिकार्यांनी पुढाकार घेवून कार्यवाही करावी,अशा सूचना जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.आशिया यांनी दिल्या.
जळगाव जिल्ह्यास आतापर्यंत २० लाख ३३ हजार ८८कोविशील्डचे, तर २ लाख ६हजार ३२८कोव्हॅक्सिनचे डोस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १६लाख नागरीकांनी पहिला डोस घेतला आहे, तर पाच लाख ४७हजार ८०७ नागरीकांना दुसरा डोस देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जमादार यांनी यावेळी दिली. ज्या तालुक्यात कोविड-१९ लस उपलब्ध आहे,अश्या तालुक्यांनी २ऑक्टोबर २०२१ रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करून जास्तीत जास्त नागरीकांचे लसीकरण करण्याची सुचनाही त्यांनी केली.