मटा ग्राउंड रिपोर्ट: वायएसआर काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला, सहकारी झाले विरोधक; यंदा परंपरा मोडणार?

अब्दुल वाजेद, मच्छलीपट्टणम (आंध्रप्रदेश) : आंध्र प्रदेशातील सर्वांत चर्चेतील लोकसभा निवडणूक म्हणून मच्छलीपट्टणमकडे पाहिले जात आहे. गेल्या निवडणुकीत वायएसआर काँग्रेसकडून निवडणूक जिंकलेले वल्लभनेनी बालशौरी या वेळी जनसेना पक्षाकडून निवडणूक रिंगणात आहेत. कालपर्यंत सहकारी असलेले आज विरोधात गेल्याने या वेळी वायएसआर काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

मच्छलीपट्टणम लोकसभा निवडणुकीत यापूर्वी काँग्रेस आणि तेलगू देसम पार्टी (टीडीपी) दोघांमध्ये कायम स्पर्धा पाहावयास मिळत होती. मतदारसंघात गन्नावरम, गुढीवडा, पेडाणा, मच्छलीपट्टणम, अवनीगुडा, पामरु आणि पेनमलुरु या सात विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. किष्णा आणि एनटीआर या दोन विभागांतील विधानसभा मतदारसंघ मच्छलीपट्टणममध्ये येतात. निवडणुकीत १५ उमेदवार रिंगणात आहेत. २०१९ मध्ये जगनमोहन रेड्डींच्या वायएसआर काँग्रेसने वल्लभनेनी बालशौरी यांना उमेदवारी दिली होती आणि ते निवडून आले होते. त्यांनी टीडीपीचे माजी खासदार कोनाकाल्ला नारायण राव यांना ६० हजार मतांनी पराभूत केले होते.

आमदार, खासदारांमधील शीतयुद्धामुळे बालशौरींनी वायएसआर काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन जनसेना पक्षाकडून निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. जन सेना पक्षाचे प्रमुख अभिनेते पवन कल्याण यांनी बालशौरींना उमेदवारी देऊन वायएसआर काँग्रेसची चांगलीच अडचण केली आहे.

वायएसआर काँग्रेसने स्वच्छ प्रतिमेचे डॉ. सिंहाद्री चंद्रशेखर राव यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या निवडणुकीत बालशौरी यांना मिळालेले यश वायएसआर काँग्रेसवर लोकांचा असलेला विश्वास असल्याचे मानले जाते. यंदा जनसेना पार्टीसोबत टीडीपी आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांचे पाठबळ आहे. बालशौरी विरुद्ध डॉ. सिंहाद्री ही प्रतिष्ठेची लढत असून, आंध्र प्रदेशचे याकडे लक्ष लागले आहे. या लढाईत काँग्रेसचे गोलू कृष्णा निवडणुकीत आहेत.

मच्छलीपट्टणम हे शहर समुद्री किनाऱ्यावर वसलेले आहे. कृष्णा विभागात असलेले शहर आहे. मच्छलीपट्टणम हे कलमकारी या हातमाग उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. येथील उद्योगातून निर्यात मोठ्या प्रमाणावर होते. कुचीपुडी या भारतीय शास्त्रीय नृत्याविष्कारही याच भागातून झाला असल्याची माहिती स्थानिक एम. रामानायडू यांनी दिली. प्रसिद्ध क्रिकेटपटू सी.के. नायडू हे याच भागातील. मळ्यालम चित्रपटामधील प्रसिद्ध कलाकार पौर्णिमा, तेलगू कलाकार जगपती बाबू; तसेच श्रीकांत बोल्ला यांनी मच्छलीपट्टणम येथे शिक्षण घेतले आहे. यानंतर बोलंट इंड्रस्ट्रिज स्थापन केली.
मटा ग्राउंड रिपोर्ट: यंदा राजघराणे निवडणूक रिंगणातून बाहेर, कोण होणार विजयनगरचा राजा?
यंदा परंपरा मोडणार ?

मच्छलीपट्टणमच्या मध्यवस्तीतील व्यापारी जी. एस. के राव म्हणाले, की आमच्या मतदारसंघात अपवाद वगळता विद्यमान खासदार पुन्हा दिल्लीत जात नाही. कोनाकाल्ला नारायण राव २००९ आणि २०१४ आणि त्यापूर्वी १९८४ आणि १९८९ मध्ये कावुरू संभा शिवाराव हे सलग दोन वेळेस निवडून गेले. त्यानंतर दर पाच वर्षांनी नवीन खासदाराला आम्ही संधी दिली आहे. यामुळे ही परंपरा मोडणार काय, याची उत्सुकता आहे.

‘श्रीकांत’चे शूटिंग छत्रपती संभाजीनगरात

अंध असलेले श्रीकांत बोल्ला यांनी बोलंट इंडस्ट्रिज सुरू केली. त्यांची पत्नी आणि मुलगी उद्योगात मदत करतात. श्रीकांत बोल्ला यांच्या खडतर आयुष्यावर आधारित चित्रपट तयार करण्यात येत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण छत्रपती संभाजीनगर विमानतळावर करण्यात आले आहे.

Source link

bjplok sabha election 2024MachilipatnamtdpYSR Congress
Comments (0)
Add Comment