छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ब्राझीलच्या नागरिकाकडून १० कोटी रुपयांचं कोकीन जप्त केलं आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने केलेल्या या कारवाईत तस्करीसाठी आणलेलं कोकीन ब्राझिलियन व्यक्ती कॅप्सूलमध्ये लपवून आणत होता.
आरोपीने कबूल केला गुन्हा
डीआरआय मुंबई अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुत्रांनी दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे डीआरआय एमजेडयूच्या अधिकाऱ्यांनी ८ मे २०२४ रोजी मुंबई विमानतळावरुन ड्रग्स घेऊन जाणाचा संशय असणाऱ्या एका ब्राझिलियन व्यक्तीला अडवलं. त्याची चौकशी केल्यानंतर त्याने भारतात तस्करी करण्यासाठी ड्रग्ज असलेल्या कॅप्सूल खाल्ल्याची बाब कबूल केली.
या ब्राझिलियन व्यक्तीला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
ब्राझिलियन व्यक्तीकडे ९७५ ग्रॅम कोकीन असणाऱ्या एकूण ११० कॅप्सूल मिळाल्या. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये याची किंमत ९.७५ कोटी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी एनडीपीएस कायदा, १९८५ च्या नियमांनुसार कोकीन जप्त करण्यात आलं. त्याशिवाय आरोपी प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. भारतातील बेकायदेशीर अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सामील असलेल्या या आंतरराष्ट्रीय टोळीच्या इतर सदस्यांचा शोध घेण्यासाठी टीम पुढील तपास करत आहे.
DRI ने जप्त केलं १५ कोटींचं ड्रग्स
डीआरआयने मागील एका आठवड्यात केलेली ही दुसरी कारवाई आहे. याआधी डीआरआय अधिकाऱ्यांनी ड्रग्स असल्याचा संशय असलेल्या एका व्यक्तीला विमानतळावर रोखलं होतं. त्या व्यक्तीकडे १४६८ ग्रॅम कोकीन असणाऱ्या ७७ कॅप्सूल मिळाल्या होत्या. त्या ड्रग्सची किंमत जवळपास १५ कोटी रुपये असल्याची माहिती होती.