सायबर गुन्हेगारीला आळा घालण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलत, दूरसंचार विभागाने (DoT) 28,200 मोबाइल हँडसेट ब्लॉक करण्याचे आणि सुमारे 20 लाख मोबाइल कनेक्शनची पुन्हा पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. सायबर गुन्हे आणि ऑनलाइन घोटाळ्यांसारख्या बेकायदेशीर कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या सिमकार्ड आणि मोबाईल हँडसेटवर कारवाई करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
३१ मे पर्यंत हे सिमकार्ड ब्लॉक करण्याचे आदेश
DoT ने सर्व दूरसंचार ऑपरेटर्सना ३१ मे पर्यंत हे सिमकार्ड ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. या सिमकार्डचा वापर बनावट कॉल, एसएमएस आणि अनेक बेकायदेशीर कामांसाठी केला जात होता. अशा सिमकार्डच्या मदतीने कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे दूरसंचार विभागाचे मत आहे. हे सिम कार्ड पुन्हा व्हेरिफाय केले जातील आणि पडताळणी होईपर्यंत ब्लॉक केले जातील.
टेलिकॉम ऑपरेटरच्या कार्यालयात जाऊन करू शकता व्हेरिफिकेशन
अशा प्रकारे नंबर व्हेरिफिकेशन करावे लागेल लाखो मोबाईल कनेक्शन्सची पडताळणी करण्यासाठी, या युजर्सना त्यांची ओळख आणि पत्ता व्हेरिफाय करावा लागेल. ही पडताळणी प्रक्रिया 1 जूनपासून सुरू होईल आणि 30 जूनपर्यंत चालेल, असे दूरसंचार विभागाने म्हटले आहे. हे पाऊल देशातील दूरसंचार यंत्रणा मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे सांगण्यात येत आहे. टेलिकॉम ऑपरेटरच्या कार्यालयात जाऊन तुम्ही तुमचा नंबर व्हेरिफाय करू शकाल.
बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी उपयुक्त
सरकारने उचललेले हे मोठे पाऊल सायबर गुन्हे आणि फसवणूक यांसारख्या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी दूरसंचार विभागाने नागरिकांना त्यांच्या जुन्या मोबाईल कनेक्शनची पुन्हा पडताळणी करण्यास सांगितले आहे. हे पाऊल सायबर गुन्हेगारांना मोठा धक्का असल्याचे सायबर सुरक्षा तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हँडसेटही केले जात आहेत ब्लॉक
सायबर गुन्ह्यांसाठी आणि घोटाळ्यांसाठी वापरले जाणारे हजारो हँडसेटही ब्लॉक केले जात आहेत. म्हणजेच या हँडसेटमध्ये आता कोणतेही सिमकार्ड वापरता येणार नाही आणि एक प्रकारे ते निरुपयोगी ठरतील.