‘पाकिस्तानकडे अण्वस्त्र असल्याने त्या देशाबाबत कठोर भूमिका घेण्याबाबत काँग्रेसने नेहमीच सावध पवित्रा घेतला. या भित्र्या लोकांनी (काँग्रेस) देशातील जनतेची उमेद संपवून टाकली’, अशी टीका मोदी यांनी केली. ‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असले तरी ते हाताळण्याची क्षमताच त्या देशाने गमावली आहे. पाकिस्तान आता अणुबॉम्ब विकण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, या बॉम्बचा दर्जा निकृष्ट असल्याने ते कोणी घेण्यासही तयार नाही’, अशी टोलेबाजी मोदी यांनी केली.
मोदी यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनाही यावेळी लक्ष्य केले. बिजू जनता दलाच्या सरकारमुळे ओडिशाची अस्मिता धोक्यात असल्याचे मोदी म्हणाले.
‘पाकव्याप्त काश्मीर मिळवणारच’
हैदराबाद : ‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असल्याच्या भीतीने देशातील सर्वांत जुन्या पक्षाला पाकव्याप्त काश्मीरवरील भारताचा हक्क सोडायचा आहे. मात्र, जोपर्यंत भाजप अस्तित्वात आहे, तोपर्यंत हे होणे अशक्य आहे. पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग असून, आम्ही तो परत मिळवू’, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी व्यक्त केला. काँग्रेसमध्ये सर्जिकल स्ट्राइक किंवा हवाईहल्ले करण्याची धमक नाही. मात्र, पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आपल्या देशावर हल्ला केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवघ्या १० दिवसांत सर्जिकल स्ट्राइक किंवा हवाईहल्ले करून त्यांचा खात्मा केला’, याची आठवण शहा यांनी यावेळी करून दिली.