तालिबान सरकारचे मुख्य प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून पुराबाबतची माहिती दिली. बदख्शान, बागलान, घोर आणि हेरात या प्रांतांना सर्वाधिक फटका बसला असून, मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
लोकांना वाचविण्यासाठी, जखमींना नेण्यासाठी आणि मृतांना बाहेर काढण्यासाठी सरकारने सर्व उपलब्ध संसाधने वापरण्याचे आदेश दिले आहेत, असे ते म्हणाले.
तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे, ‘देशाच्या हवाई दलाने बागलानमधील लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे आणि पूरग्रस्त भागात अडकलेल्या मोठ्या संख्येने लोकांना बाहेर काढले आहे. शंभर जखमींना या भागातील लष्करी रुग्णालयात नेले आहे.’
अफगाणिस्तानातील मानवी हक्कांच्या स्थितीवर संयुक्त राष्ट्रांचे विशेष दूत रिचर्ड बेनेट यांनी ‘एक्स’वर सांगितले, की हा पूर अफगाणिस्तानच्या हवामान संकटाच्या असुरक्षिततेची आठवण करून देतो. तालिबान आणि आंतरराष्ट्रीय घटकांकडून त्वरित मदत आणि दीर्घकालीन नियोजन या दोन्हींची आवश्यकता आहे.
एप्रिलमध्ये देशात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे किमान ७० लोकांचा मृत्यू झाला होता. सुमारे दोन हजार घरे, तीन मशिदी आणि चार शाळांचेही नुकसान झाले होते, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे.