गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा घेऊन अमरावती जिल्ह्यातील परतवाडा इथे मूकबधीर, दिव्यांग आणि बेवारस मुलांना पितृछत्र देणाऱ्या ‘वझ्झर’ मॉडेलचे जनक शंकरबाबा पद्मश्री सन्मान स्वीकारण्यासाठी दिल्लीत आले होते. प्रचलित कायद्यात दुरूस्ती करून, या मुलांना १८ वर्षांनंतरही सरकारी मदत मिळत राहावी, हा त्यांचा ध्यास त्यांना पुरस्कार वितरणावेळीही स्वस्थ बसू देत नव्हता. यापूर्वी वझ्झर आश्रमाला अनुदानित तत्त्वावर मान्यता देण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव नाकारून पूर्णतः समाजाकडून, सामाजिक-धार्मिक संस्थांकडून मिळणाऱ्या मदतीवर आश्रमाचा कारभार चालवण्याचा निश्चय कायम असलेले ८०च्या घरातले शंकरबाबा, ‘मोडला नाही कणा…’, या निर्धाराने पुढे जात आहेत.
राष्ट्रपती भवनातील पद्म पुरस्कार वितरणात, ‘कैसे है आप’, असे विचारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे व उपराष्ट्रपतींकडेही त्यांनी या कायद्याचाच विषय काढला. गृहमंत्री अमित शहांनी त्यांची तळमळ पाहून म्हणाले, ‘हमे सारा विषय मालूम है. हम ये कानून करेंगे, जरूर करेंगे. पहले आप खाना खा लिजिये.’
शंकरबाबा सांगतात, पूर्वी मी देवकीनंदन गोपाळा नावाचे मासिक काढायचो. १९७५ ते १९८० मध्ये मी दिल्लीतही वास्तव्याला होतो. इथे फार वेगळे वातावरण होते. झाडांनी वेढलेली दिल्ली बरीच शांत होती. आता नेत्यांच्या बंगल्याच्या बाहेर सुरक्षा रक्षक बंदुका घेऊन उभे असतात आणि दारेही बंद असतात. अपॉइंटमेंट घेतलेली असली तरी आत जायचे तर सह्या कराव्या लागतात. तेव्हा तसे नव्हते. वरिष्ठ नेत्यांच्या बंगल्यांच्या प्रवेशद्वारांवर पोलिस असायचे, पण ते अडवायचे आणि दरडवायचेही नाहीत. आम्ही इंदिराजी (इंदिरा गांधी), मोरारजीभाई यांच्यासारख्या नेत्यांच्या बंगल्यांमध्ये बिनदिक्कत जायचो. त्यांना भेटायचो. मी काँग्रेस कार्यसमितीचाही सदस्य असल्याने अनेकदा इंदिराजी, क्यों भाई, क्या कहता है आपका विदर्भ, असे विचारायच्या.
पहाडगंजमध्ये मिळणारे छोले भटूरे खाण्याची इच्छा झाली की, इंदिराजींची गाडी थेट पहाडगंजमधील गर्दीत जाऊन थांबायची. मोरारजीभाई सकाळचा फेरफटका मारण्यासाठी निघाले की, आम्हीही त्यांच्याबरोबर चालत असू. त्यांनी कधी, हा काँग्रेसवाला म्हणून माझ्याकडे पाहिले नाही. आता मी पाहिले तर या दिल्लीत चहूबाजूंनी उंचच उंच इमारती दिसतात, मेट्रो धावताना दिसते, ओव्हरब्रिज दिसतात, वाहनांचा तर पूरच आला आहे, सारा काही झगमगाट दिसतो. पण, इथली माणुसकी कुठे गायब झाली ते कळत नाही.’ पण, हे मुंबई- नागपूरपासून साऱ्याच शहरांच्या बाबतीत म्हणता येईल ना, असे विचारल्यावर, ‘तसे असले तरी अखेर दिल्ली ही दिल्लीच आहे ना’, असे शंकरबाबा म्हणाले.
चार दशकांपूर्वी दिल्लीत आम्ही इंदिराजी (इंदिरा गांधी), मोरारजीभाई यांच्यासारख्या नेत्यांच्या बंगल्यांमध्ये बिनदिक्कत जायचो. वरिष्ठ नेत्यांच्या बंगल्यांच्या प्रवेशद्वारांवर पोलिस असायचे, पण ते अडवायचे नाहीत. आताचे चित्र फार वेगळे आहे.-पद्मश्री शंकरबाबा पापळकर