हायलाइट्स:
- तपास यंत्रणांच्या रडारवरून परमबीर गायब
- नाना पटोलेंनी केली होती केंद्र सरकारवर टीका
- देवेंद्र फडणवीसांनी दिले खोचक उत्तर
नागपूरः मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (parambir singh) सध्या कुठे आहेत, हे तपास यंत्रणांनाही माहीत नाही. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात ‘एनआयए’ने समन्स पाठवूनही परमबीर चौकशीला उपस्थित राहिले नाहीत. परमबीर हजर होत नसल्याने अटकेच्या भीतीनेच ते गायब झाल्याचे म्हटले जात आहे. यावरुन काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नाना पटोलेंना खोचक शब्दांत टोला लगावला आहे.
आज देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टीसंदर्भात बोलत असताना राज्य सरकारवरही निशाणा साधला आहे. त्याचबरोबर परमबीर सिंह या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य करत नाना पटोलेंवर मिश्किल टिप्पणी केली आहे.
नाना पटोले काहीही बोलत राहतात, त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर देता येणार नाही. नाना पटोले असे व्यक्ती आहेत की ते अमेरिकेच्या अध्यक्षांच्या बाबतीत देखील बोलून शकतात, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
वाचाः कार चालकानं अचानक युटर्न घेतल्यानं दुचाकीवरील दोघांचा मृत्यू; पाहा अपघाताचा थरारक व्हिडिओ
राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना सीबीआयने समन्स बजावले आहेत याबाबत बोलताना त्यांनी मला यासंदर्भात कोणतीही माहिती नाही, असं स्पष्ट केलं आहे. तसंच,मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक हे दोन्ही पद महत्त्वाचे पद आहेत… त्या संदर्भात असा स्पेक्युलेशन करून बोलणं योग्य होणार नाही, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
वाचाः औषधांचा खर्च परवडत नाही; निर्दयी बापाने पोटच्या मुलाला नदीत फेकले
सरकारच्या घोषणा कागदावरच राहिल्या
ज्यावेळी मोठी नैसर्गिक आपत्ती येते. तेव्हा नजर आणेवारीच्या आधारावरच आपल्याला तातडीची मदत करण्याचा विचार करावा लागतो. राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी निर्णय घ्यावा. ठाकरे सरकारच्या सगळ्या घोषणा केवळ कागदावरच आहेत. पंचनाम्याआधी मदत करा. केवळ पोकळ आश्वासने देऊ नका. प्रत्यक्ष मदत करा, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
नैसर्गिक आपत्तीच्या वेळेला सरकारकडून करण्यात आलेल्या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत. कुठल्याच गोष्टीची पूर्तता झालेली नाही. जेवढ्या आपत्ती आल्या त्या संदर्भातल्या सर्व घोषणा कागदावरच राहिल्या आहेत. शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचलेली नाही. अगदी कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, पूर्व विदर्भ सर्व आपत्तीच्या वेळेला सरकार ने केलेल्या घोषणा पूर्ण झालेले नाहीत, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
वाचाः ‘काँग्रेस बुडवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली’